सोन्याची पोत गहाण ठेवून घेतलेली रोख लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 04:22 IST2017-05-14T04:22:40+5:302017-05-14T04:22:40+5:30
दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल.

सोन्याची पोत गहाण ठेवून घेतलेली रोख लंपास!
अकोला: सराफा व्यावसायिकाकडे सोन्याची पोत गहाण ठेवून त्याच्याकडून मिळालेली १७ हजार रुपयांची रोख बॅगेत ठेवल्यानंतर दोन अज्ञात महिलांनी ही रोख लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उगवा येथे राहणारे दत्तात्रय गोपाल परनाटे(३२) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी ते पत्नीची २५ ग्रॅम सोन्याची पोत गहाण ठेवण्यासाठी सराफा बाजारात आले. बाजारातील भिकमचंद खंडेलवाल सराफा दुकानामध्ये ते गेले. त्यांनी सोन्याची पोत गहाण ठेवली आणि सराफा व्यावसायिकाकडून १७ हजार रुपये घेतले. हे पैसे त्यांनी बॅगेत ठेवले आणि दुकानाच्या बाहेर आले. यावेळी याठिकाणी असलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या बॅगेतील १७ हजार रुपयांची रोख काढून घेतली. काही वेळानंतर परनाटे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध भादंवि कलम ३७९(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सराफा दुकानातील सीसी कॅमेर्याची तपासणी केली असता, कॅमेर्यामध्ये दोन महिला बॅगेतून रोख काढताना दिसून आल्या. पोलिसांनी महिलांचा शोध सुरू केला आहे.