परवाना विभाग प्रमुखाची उचलबांगडी
By Admin | Updated: May 25, 2017 01:33 IST2017-05-25T01:33:44+5:302017-05-25T01:33:44+5:30
मनपा आयुक्तांचे निर्देश; शिक्षण विभागात होणार बदली

परवाना विभाग प्रमुखाची उचलबांगडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात व्यवसाय करणाऱ्यांच्या परवान्याचे परस्पर नूतनीकरण न करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवाना विभागाचे प्रमुख राजेंद्र गोतमारे यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. गोतमारे यांची शिक्षण विभागात बदली करण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले आहेत.
शहरात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरणाच्या बदल्यात मनपाला शुल्क जमा करावे लागतात. नूतनीकरणाचा प्रस्ताव परवाना विभागामार्फत उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी तसे न करता परवाना विभागाच्या स्तरावर परस्पर ही प्रक्रिया राबवली जात असल्याची बाब उपायुक्त समाधान सोळंके यांच्या निदर्शनास आली होती. यासंदर्भात त्यांनी परवाना विभाग प्रमुख राजेंद्र गोतमारे यांना नूतनीकरणाचे प्रस्ताव उपायुक्त किंवा सहायक आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. साहजिकच, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होणे अपेक्षित असताना मार्च महिन्याच्या कालावधीत शहरातील असंख्य व्यावसायिकांच्या परवान्याचे विभाग प्रमुख गोतमारे यांनी परस्पर नूतनीकरण केल्याची बाब समोर आली. या प्रकरणाची दखल घेत ही बाब उपायुक्तांनी आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विभाग प्रमुख गोतमारे यांना निलंबित करण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले होते. निलंबन केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन द्यावे लागत असल्यामुळे गोतमारे यांचे निलंबन न करता त्यांची शिक्षण विभागात बदली करण्यासह त्यांचे दोन महिन्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले आहेत.
विभागाला दलालांचा विळखा
शहरातील ज्या व्यावसायिकांना मनपाने परवान्यांचे वाटप केले, अशा परवान्याची मुदत कधी संपते, त्याची इत्थंभूत माहिती परवाना विभागात जमा आहे. संबंधित व्यावसायिकांची भेट घेऊन परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी या विभागात चार दलाल सक्रिय आहेत. नूतनीकरणासाठी प्रत्येक व्यावसायिकाकडून दोन हजार रुपये घेतल्यानंतर सेतू संचालकाला ५०० रुपये आणि उर्वरित दीड हजारात इतर सर्वजण अशी ही ‘शाळा’ सुरू असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.