लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:57+5:302021-07-07T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोणाकडे ॲॅण्ड्राइड मोबाइल आहे, तर ॲॅण्ड्राइड मोबाइल असूनही कुणाला तांत्रिक बाबी कळत नसल्याने ...

लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोणाकडे ॲॅण्ड्राइड मोबाइल आहे, तर ॲॅण्ड्राइड मोबाइल असूनही कुणाला तांत्रिक बाबी कळत नसल्याने घरबसल्या परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे अवघड होऊन बसले आहे. लर्निंग लायसन्ससाठी ऑफलाइन प्रक्रियाच सोपी वाटत असल्याने अनेक उमेदवार पुन्हा आरटीओ कार्यालयात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.
शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षार्थींऐवजी तोतया उमेदवार अथवा इतरांमार्फत परीक्षा दिली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया औपचारिकता उरेल, असे काहींचे म्हणणे आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेला किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला उमेदवार या प्रक्रियेतून विनासायास पुढे जाईल व अपघाताला बळी पडेल, असेही आरटीओ कार्यालयात आलेल्या काही उमेदवारांनी सांगितले. शहराच्या ठिकाणी ॲॅण्ड्राइड मोबाइल चालतो. परंतु ग्रामीण भागात ते मोबाइल काय साधाही मोबाइलही चालत नाही. कधी रेंज असते, तर कधी मोबाइल चार्जिंग झालेला नसतो. शिवाय मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसणे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे लर्निंग लायसन्स अडकून बसून परीक्षा अर्धवटच राहाते. नाइजाने आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे.
कोरोना महामारीमुळे शासनाने ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली आहे. परंतु, तांत्रिक बाबीमुळे आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
-----------------
ऑनलाइनसाठी अडचणी काय?
कोरोनामुळे शासनाने लर्निंग लायन्स काढण्यासाठी घरबसल्या सुविधा दिली आहे. परंतु, यात तांत्रिक बाबींचे अडथळे येत आहेत. काही ठिकाणी ॲॅण्ड्राइड चालतो, तर काही ठिकाणी ॲॅण्ड्राइड मोबाइलला रेंजही मिळत नाही. कधी तर लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देतेवेळेसच मोबाइल हँग होऊन बसतो, तर कधी अचानक चार्जिंग संपते. त्यातच मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसल्याने ओटीपी मिळत नाही. काहींना तर लर्निंगसाठीची ऑनलाइन पद्धत समजत नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयात येण्याची वेळ येत आहे.
-------------------------
२०० लायसन्स ऑनलाइन
जिल्ह्यात १४ जूनपासून ऑनलाइन लर्निंग लायसनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन पद्धत समजत नाही म्हणून आतापर्यंत जवळपास २०० लायसन्स ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाले, तर २२० लायसन्स ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांना दिले गेले.
------------
शासनाने ऑनलाइन सुरू केलेली लर्निंग लायसन्सची प्रक्रिया चांगली आहे. परंतु, काही उमेदवारांना यात अडचणी येत आहेत. ऑनलाइनची माहिती नसेल तर आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून ती घ्यावी. लर्निंग अथवा परमनंट लायसनसह इतर कोणतीही अडचण आल्यास आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घ्यावी.
- ज्ञानेश्वर हिरडे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला
-----------------
शासनाने लागू केलेली लर्निंगसाठी ऑनलाइन पद्धती चांगली आहे; परंतु ग्रामीण भागात ॲॅण्ड्राइड मोबाइल चालत नाही. मोबाइल ॲॅण्ड्राइड असूनही तांत्रिक बाबी काही समजायला मार्ग नाही. ऑनलाइन पद्धत काय असते, हे समजून घेण्यासाठी आलो होतो. परंतु, साहेब भेटले नाहीत. ऑनलाइन पद्धतीसाठी मोबाइल क्रमांक आधार लिंक असणे आवश्यक आहे. यापलीकडे कोणतीही विस्तृत माहिती आम्हाला मिळालेली नाही.
-श्याम शेंडे
--------------
लर्निंग लायसन्ससाठी शासनाने ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. ही पद्धत चांगली असली तरी तांत्रिक बाबी काही समजत नाहीत. परीक्षा देतेवेळेस मोबाइल हँग होत आहे. ऑनलाइन समजत नाही म्हणून तर आरटीओ कार्यालयात आलो. ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्याबाबत आरटीओ कार्यालयाने सर्वांना मार्गदर्शन करावे व ही समस्या दूर करावी.
- दीपक यादव
-----------------------
उमेदवार वेगळा; ऑनलाइन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाइन प्रकारामुळे तोतयागिरी वाढली आहे. परीक्षा देणारा वेगळाच असतो आणि त्याला सांगणारा हा वेगळाच असतो. या अशा प्रकारामुळे पुढे चालून परीक्षार्थीला अपघातास सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. लर्निंगमध्ये पास झाल्याचा आनंद मिळत असला तरी परमनंट लायसन्स काढतेवेळेस प्रश्नांची उत्तरे देताना जवळ कोणीही नसणार आहे.