दहा कोटींच्या खर्चानंतरही गळती!

By Admin | Updated: May 14, 2017 04:32 IST2017-05-14T04:32:30+5:302017-05-14T04:32:30+5:30

८४ खेडी पाणीपुरवठा योजना : पुढील आठवड्यात संयुक्त समितीचा तपासणी दौरा

Leak even after spending 10 crores! | दहा कोटींच्या खर्चानंतरही गळती!

दहा कोटींच्या खर्चानंतरही गळती!

अकोला : खारपाणपट्टय़ासह जिल्हय़ातील ७९ गावांना पाणीपुरवठा करणार्या ८४ खेडी प्रादेशिक योजनेचे हस्तांतरण करण्यापूर्वीच दहा कोटी रुपये खर्चातून केलेल्या विशेष दुरुस्तीच्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कधीही खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातूनच पाणी सोडण्याची मागणी करणार्या करतवाडी येथील ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली आहे.
अकोट ८४ खेडी योजनेतून अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यांतील ७९ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या निर्मितीपासून देखभाल व दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सुरू आहे. शासनाने गेल्यावर्षी २0१५-१६ च्या टंचाईमध्ये योजनेला त्या १0 कोटी २0 लाख ७0 हजार रुपयांच्या निधी दिला. टंचाईतील विशेष दुरुस्तीची कामे ३१ मार्च २0१७ रोजी पूर्ण झाली. त्यासोबतच योजनेची देखभाल व दुरुस्ती, योजना व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे त्याच आदेशात नमूद होते.
त्यामुळे जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला पत्र देत १ एप्रिलपासून योजना हस्तांतरित करून घेण्याचे कळविले. जीवन प्राधिकरणाकडून संपूर्ण कामे केल्याचे सांगण्यात येत आहे, तर अनेक गावांमध्ये पाणी पोहोचतच नसल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे, त्यामुळे मोठाच घोळ झाला आहे, तसेच प्राधिकरणाकडून योजना हस्तांतरित करण्याचा तगादा लावण्यात आला. योजना हस्तांतरणासाठी त्यावर अवलंबून असलेल्या गावांचे सरपंच, सचिव व सदस्यांची बैठक अकोट येथे २६ एप्रिल घेण्यात आली. त्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी योजनेतील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन संयुक्त तपासणी करावी, असे निर्देश दिले. त्यानुसार ६ मेपासून तपासणीही ठरली; मात्र ती पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, अनेक गावांमध्ये पाणी पोहोचतच नसल्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. त्यातूनच ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली आहे.


करतवाडी ग्रामस्थांवर गुन्हे
योजनेतील शेवटचे गाव करतवाडी येथे पाणी पोचत नाही. ही बाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी एस.पी. डांगरे याने पोलिसांत तक्रार दिल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. सोबतच विशेष दुरुस्तीतून टाकण्यात आलेली लोखंडी जलवाहिनी लिकेज असल्याने पाणी मिळणार नाही, असेही डांगरे यांनी सांगितल्याने जलवाहिनीच्या लिकेजचा घोळ पुढे आला आहे.

संयुक्त पाहणी अहवालानंतर ठराव
जिल्हय़ातील ७९ गावांमध्ये पाणीपुरवठय़ाची सद्यस्थिती काय आहे, टंचाई काळातील निधीतून कामे पूर्ण झाली की नाही, या संपूर्ण बाबींची खातरजमा करण्यासाठी झोननिहाय तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी सात झोनमध्ये संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरणचे अभियंता यांच्या उपस्थितीत पाहणी होणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात नियोजन केले जाणार आहे. पाहणी अहवालानुसार जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन योजना हस्तांतरित होणार आहे.


योजना हस्तांतरणासाठी ठरल्यानुसार संयुक्त तपासणी दौरा होणार आहे. त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल, सोबतच योजनेबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत घेतल्यानंतरच जुलैमध्ये हस्तांतरणाची शक्यता आहे. उन्हाळ्यात काही गावांमध्ये पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत.
- किशोर ढवळे, प्रभारी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद.

Web Title: Leak even after spending 10 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.