सावित्रींच्या लेकींची शौचालय बांधकामातही आघाडी

By Admin | Updated: December 10, 2014 00:07 IST2014-12-10T00:07:02+5:302014-12-10T00:07:02+5:30

१२१ महिलांनी बांधले शौचालय

The lead in Savitri's toilets | सावित्रींच्या लेकींची शौचालय बांधकामातही आघाडी

सावित्रींच्या लेकींची शौचालय बांधकामातही आघाडी

संतोष वानखडे / वाशिम
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्‍या सावित्रीच्या लेकी, अर्थात महिला शौचालय बांधकामातही पुढेच असल्याचे चित्र दिसत आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या कालावधीत कुटुंबप्रमुख असलेल्या १२१ महिलांनी स्वत:च्या घरी शौचालय बांधून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेले निर्मल भारत अभियान वाशिम जिल्ह्यातही राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वच्छता अभियान कक्षाच्यावतीने घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. सर्वच घटकांकडून वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम होत असल्याने आपणच मागे का रहावे, या प्रश्नावर जिल्ह्यातील महिला कुटुंबप्रमुखांनी मंथन केले. त्या केवळ मंथन करूनच थांबल्या नाहीत; तर शौचालय बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण केले. एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात १२१ महिलांनी स्वत:च्या घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण केले आहे. सर्वाधिक ३१ शौचालयांचे बांधकाम मानोरा तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल मंगरुळपीर तालुक्यात २९, कारंजा व रिसोड प्रत्येकी २५ तर वाशिम तालुक्यात ११ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात जवळपास १६0 महिला कुटुंबप्रमुखांनी आणखी शौचालय बांधकाम करण्याचा संकल्प सोडला आहे.
हगणदरीमुक्ती आणि शौचालय बांधकामाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व स्वच्छता अभियानाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. घरी शौचालय नसल्याची गैरसोय महिलावर्गाला सर्वाधिक सहन करावी लागते. शौचालय बांधकामासाठी महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे. याचाच परिणाम म्हणजे आठ महिन्यात १२१ महिलांनी घरी शौचालय बांधकाम केले असल्याचे वाशिम जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगीतले.

*मालेगाव तालुका निरंक
मालेगाव तालुक्यात चालू वर्षाच्या आठ महिन्यात एकाही महिला कुटुंबप्रमुखाने वैयक्तिक शौचालय बांधकामाचा श्रीगणेशा केला नाही. जनजागृती मोहिमेला मालेगाव तालुक्याकडे आता विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title: The lead in Savitri's toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.