दोन अट्टल चोरट्यांना एलसीबीने केले गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST2021-06-19T04:13:58+5:302021-06-19T04:13:58+5:30

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. ...

LCB nabbed two notorious thieves | दोन अट्टल चोरट्यांना एलसीबीने केले गजाआड

दोन अट्टल चोरट्यांना एलसीबीने केले गजाआड

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विनीत राजेश शहा यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात १६ जून रोजी चोरीची तक्रार दिली होती. त्यांच्याकडील सुमारे एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला होता. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनातील पथकाचे प्रमुख सागर हटवार यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी प्रशांत अनंतराव जायले वय ३२ वर्षे राहणार डाबकी रोड व मिलिंद शेषराव सावळे वय ३८ वर्षे राहणार कृषिनगर या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली. यावरून त्यांच्याकडून सुमारे एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांना पुढील तपासासाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, अब्दुल माजिद, संदीप तवाडे, मोहम्मद रफी, एजाज अहमद यांनी केली.

Web Title: LCB nabbed two notorious thieves