सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण बंद; साहित्य जप्त
By Admin | Updated: March 6, 2015 02:07 IST2015-03-06T02:07:36+5:302015-03-06T02:07:36+5:30
करमणूक कर थकीतप्रकरणी अकोला जिल्हाधिका-यांच्या पथकाची कारवाई.

सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण बंद; साहित्य जप्त
अकोला: थकीत करमणूक करापोटी शहरातील सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण बंद करून, प्रक्षेपणाचे साहित्य जप्त करण्याची कारवाई जिल्हाधिकार्यांच्या करमणूक कर वसुली पथकामार्फत बुधवारी करण्यात आली. जिल्ह्यातील करमणूक कर वसुलीचे यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार करमणूक कर वसुली करण्याकरिता जिल्हा स्तरावर पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामार्फत केबल ऑपरेटर्सकडून थकीत करमणूक कर वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये थकीत करमणूक करापोटी अकोला शहरातील बैदपुरा येथील एजाज खान, भीमनगरमधील किरण इंगळे, सोनटक्के प्लॉटमधील मंगेश वाडेकर व राजू पठाण, मोहता मिल रोडस्थित शेख आसीफ शे.हसन व राधाकिसन प्लॉटमधील चंदू शहा इत्यादी सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण साहित्य जप्त करून, त्यांचे केबल प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई करण्यात आली. या सहा केबल ऑपरेटर्सकडे एकूण २ लाख १६ हजार ९२५ रुपये करमणूक कर थकीत असून, थकीत करमणूक करापोटी त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. करमणूक कराचा भरणा न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पथकामार्फत सदर केबल ऑपरेटर्सना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये देण्यात आला.