निलेश धांडे अमर रहे...साश्रुनयनांनी वीर जवानास अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 20:05 IST2021-10-04T20:04:50+5:302021-10-04T20:05:02+5:30
Martyer Nilesh Dhande : भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी सोमवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

निलेश धांडे अमर रहे...साश्रुनयनांनी वीर जवानास अखेरचा निरोप
अकोटः अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी सोमवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी या वीर जवानास अखेरचा निरोप दिला.
शहीद निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सीमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर या पदावर सन २०१३ पासून कार्यरत होते. नागालँड येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.४) विशेष विमानाने नागालँड येथून नागपूर व नागपूर येथून विशेष वाहनाने मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दीड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे. याप्रसंगी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तहसीलदार निलेश मडके, जऊळका सरपंच उषाताई काठोडे, ग्रामसेवक रेखाते, सुभेदार मेजर डी.पी. धांडे, माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.एस. पडोळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण शब्दात निलेश धांडे यांना श्रद्धाजंली वाहिली.