किडनी विकणा-या महिलेच्या मुलाच्या बँक खात्यात आढळली लाखोंची रोकड!
By Admin | Updated: December 23, 2015 02:42 IST2015-12-23T02:42:57+5:302015-12-23T02:42:57+5:30
किडनी तस्करी प्रकरणी आरोपी सिरसाटच्या घराची झडती.

किडनी विकणा-या महिलेच्या मुलाच्या बँक खात्यात आढळली लाखोंची रोकड!
अकोला: किडनी खरेदी-विक्रीचा व्यवहार सिद्ध होऊ नये, यासाठी किडनी विकत घेणार्यांनी किडनी विकणार्या शांताबाई खरात हिच्याऐवजी तिच्या मुलाच्या बँक खात्यामध्ये दीड लाख रुपये टाकले होते, अशी माहिती मंगळवारी उजेडात आली. पोलिसांनी या बँक खात्याची मंगळवारी तपासणी केली असता, त्यात ही रक्कम अद्यापही जमा असल्याचे स्पष्ट झाले. किडनी खरेदी-विक्रीचा व्यवहार सिद्ध होऊ नये, यासाठी आरोपी शिवाजी कोळी, देवेंद्र सिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार यांनी बनावट कागदपत्रे बनविली होतीच; आता त्यांनी किडनी देण्या व घेण्यासाठी केलेला व्यवहार किडनी प्रत्यारोपण अधिकार समिती आणि डॉक्टरांना कळू नये, यासाठी शांताबाई खरात, देवानंद कोमलकर, विजय सिरसाट, अजय चावरे, संतोष गवळी यांच्या बँक खात्यांऐवजी त्यांची मुले, नातेवाइकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले. शांताबाई खरात हिच्या मुलाच्या बँक खात्यात आरोपींनी दीड लाख रुपयांची रोकड टाकली होती. या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात पैसे आढळले. मंगळवारी पोलिसांनी शांताबाई खरात हिच्यासोबतच आरोपी देवेंद्र सिरसाटच्या हरिहरपेठेतील घराची झडती घेतली. झडतीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, पीएसआय सूर्यवंशी यांनी दोघांच्या घरांची झडती घेतली. किडनी विक्रेत्यांची किडनी काढण्यापूर्वीच त्यांच्या मुलांच्या व नातेवाइकांच्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्यात पैसे जमा करण्यात आले होते, तर काही विक्रेत्यांना रोख रक्कम देण्यात आली होती, अशी माहिती आरोपी सिरसाट याच्या चौकशीतून समोर आली आहे. किडनी तस्करी प्रकरणामध्ये औरंगाबाद येथील इस्पितळातील डॉक्टर आणि किडनी प्रत्यारोपण अधिकार समितीचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे खदान पोलिसांनी डॉक्टर व समितीतील अध्यक्ष, सदस्यांना समजपत्र बजावले आहेत. डॉक्टर व समिती सदस्य अकोल्यात आले नाही, तर पोलीस त्यांचे जबाब नोंदविण्यासाठी औरंगाबादला जाण्याची शक्यता आहे.