पाणीपुरीच्या गाडीवर काम करणा-या ‘लखन’ची भरारी

By Admin | Updated: June 9, 2016 02:01 IST2016-06-09T02:01:08+5:302016-06-09T02:01:08+5:30

पाणीपुरीच्या गाडीवर काम करून मिळविले इयत्ता दहावीच्या निकालात ७७ टक्के गुण.

Lakhan fighter who works on a water train | पाणीपुरीच्या गाडीवर काम करणा-या ‘लखन’ची भरारी

पाणीपुरीच्या गाडीवर काम करणा-या ‘लखन’ची भरारी

राम देशपांडे/ अकोला
अनंत अडचणींचा सामना केल्यानंतर मिळविलेल्या यशाची गोडी काही औरच असते. महत्प्रयासाने संपादन केलेल्या यशाचं तेज लखनच्या चेहर्‍यावर साफ झळकतं. पाणीपुरीच्या गाडीवर दिवसाला शंभर रुपये मिळविणार्‍या गुरू नानक विद्यालयाच्या लखन बाळू वानखडे या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीमध्ये ७७ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
सोमवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेची ओढ लागल्यागत शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी ९0 टक्क्यांच्या वर गुण संपादन केले; मात्र या स्पर्धेत अनंत अडचणींचा सामना करीत स्वत:चं अस्तिव सिद्ध करणारे विद्यार्थी काही न्यारेच म्हणावे लागतील. येथील गुरू नानक विद्यालयाच्या लखन बाळू वानखडे या विद्यार्थ्याने पाणीपुरीच्या गाडीवर शंभर रुपये रोजाने काम करून इयत्ता दहावीच्या निकालात ७७ टक्के गुण मिळविले. कैलास टेकडी परिसरात भाड्याच्या खोलीत आई आणि लहान बहिणीसमवेत लखन राहतो. लखनचे वडील बाळू सुदामराव वानखडे छत्तीसगढमधील राजनंदगाव येथे ह्यजयभारतह्ण नामक बँड पार्टीत कामाला आहेत. लग्नसराईनुसार कमाई होत असल्याने लखनच्या वडिलांना जेमतेम घरखर्च भागवणे शक्य होते. या परिस्थितीचा विचार करून वर्षभरापूर्वीच लखनने गौरक्षण मार्गावरील एका पाणीपुरीवाल्याकडे काम मिळविले. शंभर रुपये रोजाने काम करणारा लखन सकाळी शिकवणीला जायचा, दुपारी शाळा आणि सायंकाळी पाणीपुरीच्या गाडीवर.
या सर्व धावपळीत लखनने रात्री उशिरापर्यंत जागून किंवा पहाटे लवकरच उठून दहावीचा अभ्यास केला. घरखर्च भागविताना वडिलांवर पडणारा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लखनने घेतलेला निर्णय नक्कीच त्याच्या वयाला साजेसा नाही; पण म्हणतात ना, परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. स्पर्धेच्या या वातावरणात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत लखनने मिळविलेल्या गुणांची टक्केवारी नक्कीच कमी आहे; मात्र ज्या परिस्थितीवर मात करून त्याने हे यश संपादन केले, ते परिश्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे म्हणावे लागेल.

Web Title: Lakhan fighter who works on a water train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.