रक्ताचा तुटवडा; ‘लोकमत’च्या आवाहनानंतर सरसावले रक्तदाते!

By atul.jaiswal | Published: May 19, 2018 05:20 PM2018-05-19T17:20:13+5:302018-05-19T17:20:13+5:30

‘लोकमत’च्या या आवाहनास भरभरून प्रतिसाद मिळत असून, शुक्रवारी २६ जणांनी स्वयंस्फूर्तीने शासकीय रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.

Lack of blood; After the appeal of 'Lokmat', blood donation! | रक्ताचा तुटवडा; ‘लोकमत’च्या आवाहनानंतर सरसावले रक्तदाते!

रक्ताचा तुटवडा; ‘लोकमत’च्या आवाहनानंतर सरसावले रक्तदाते!

Next
ठळक मुद्देयावर्षी शासकीय रक्तपेढीत अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, दैनंदिन गरज भागविण्यापुरतेही रक्त उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून रक्तदात्यांना आवाहन केले होते. याची दखल घेत शुक्रवारी अनेक रक्तदाते पुढे आले.


अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीत सर्वच गटांच्या रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, गरजुंना रक्तासाठी वणवण भटकावे लागत आहे. रक्तटंचाईवर प्रकाश टाकणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करून रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. ‘लोकमत’च्या या आवाहनास भरभरून प्रतिसाद मिळत असून, शुक्रवारी २६ जणांनी स्वयंस्फूर्तीने शासकीय रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.
दरवर्षी उन्हाळ्यात सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांचे प्रमाण रोडावत असल्यामुळे रक्तटंचाई निर्माण होते. रक्त मिळत नसल्याने गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. अकोल्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण मोठ्या संख्येने येतात. यापैकी शस्त्रक्रियेची गरज असलेले किंवा अपघातात जखमी झालेल्यांना रक्ताची गरज भासते. यावर्षी शासकीय रक्तपेढीत अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, दैनंदिन गरज भागविण्यापुरतेही रक्त उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून रक्तदात्यांना आवाहन केले होते. याची दखल घेत शुक्रवारी अनेक रक्तदाते पुढे आले. शुक्रवारी हर्षा भगत, विवेक रिंगणे, दत्तात्रय इंगळे ,बुद्धभूषण डोंगरे, गजानन थेर, धीरज विश्वकर्मा, जीतू गंगापाये, साबिर खान, नितीन नेवारे, रोशन मोहोड, कमलेश सरदार, शरद पवार, आकाश मानकर, मंगेश येउल, सूरज सावके, प्रवीण गवई, संजय डाबेराव, रतन मुसळे, शरद आकोत, अंकुश इंगळे, रेहान काजी, सचिन सांगळे, योगेश इंगळे, शीलवान दामोदार, प्रकाश दामोदर या रक्तदात्यांनी रक्तदानासंदर्भात व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप चालविणारे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांच्या माध्यमातून उपरोक्त रक्तदात्यांना सर्वोपचारच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.

‘प्रहार’ तर्फे २३ मे ला अकोटात रक्तदान शिबिर
‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अकोट येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रॅलीनिमित्त अकोटात रक्तदान शिबिर घेण्यात येणार होते. आधी हे शिबिर खासगी रक्तपेढीच्या माध्यमातून घेतले जाणार होते; परंतु ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन आम्ही आता शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून अकोट येथे अग्रसेन भवन येथे रक्तदान शिबिर घेणार असल्याचे पुंडकर यांनी सांगितले. ‘रक्तासाठी शरीरसुखाची मागणी’ केल्याचा प्रकार सर्वोपचार रुग्णालयात घडला होता. अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी बच्चू कडू हे स्वत: त्यांच्या कार्यकर्त्यांसह २४ मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात येऊन रक्तदान करणार असल्याचेही तुषार पुंडकर यांनी सांगितले.

 

Web Title: Lack of blood; After the appeal of 'Lokmat', blood donation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.