कामाच्या शोधात मजूर परप्रांतात
By Admin | Updated: March 20, 2015 00:39 IST2015-03-20T00:39:46+5:302015-03-20T00:39:46+5:30
लोणार तालुक्यातील गंधारी निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर; रोहयो ठरतेय कुचकामी.

कामाच्या शोधात मजूर परप्रांतात
लोणार (बुलडाणा): रोहयोच्या कामांमधून मजूरांना रोजगार मिळत नसल्याने, मजुरांचे स्थलांतर वाढत आहे. यातूनच तालुक्यातील गंधारी या एकाच गावातील तब्बल १५00 पेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याची माहिती असून, स्थलांतराची प्रक्रीया सुरूच असल्याने गाव निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील गंधारी हे ३ हजार लोकसंख्या असलेले गाव. येथील ७0 टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह मजुरीवरच चालतो. परंतु परिसरात हाताला काम मिळत नसल्याने या कुटुंबांना कामाच्या शोधात परप्रांतात धाव घ्यावी लागली. रोजगार हमी योजनेतील कामे जेसीबीसारख्या यंत्राने पूर्ण होत असल्याने ही योजना रोहयो मजुरांसाठी मृगजळ ठरत आहे. यावर्षी गावातील जवळपास १५00 ते १८00 मजूर आपल्या कुटुंबासह मुंबई, पुणे, नाशिक, पनवेल, सुरत, धुळे आदी ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत झाली आहेत. गावातील बहुतांश कुटुंब मजुरीवर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून कामे सुरू होणे गरजेचे आहे. २00७ साली मजुरीसाठी स्थलांतरित झालेल्या या गावातील १७ मजुरांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकर्यांच्या हाताला गावातच काम उपलब्ध करून देण्याचा मुद्दा प्रशासन गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही फरक पडला नाही. गंधारी येथे वनविभागाकडून सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामावर १00 मजूर, रोहयोच्या सिंचन विहिरींच्या कामावर १0 मजूर व सामाजिक वनिकरण विभागाच्या वृक्षलागवडीच्या कामावर ८ मजूर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेतून कामे सुरू झाल्यास मजुरांना परप्रांतात स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.