कुशवाह खून प्रकरणातील दोघे गजाआड
By Admin | Updated: May 16, 2017 02:05 IST2017-05-16T02:05:17+5:302017-05-16T02:05:17+5:30
अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड: दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशातील

कुशवाह खून प्रकरणातील दोघे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बोरगावमंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा परिसरातील बंधुगोटा फाट्यानजीक घडलेल्या जगदीशसिंह कुशवाह यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना सोमवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील कनोज जिल्ह्यातील रहिवासी कल्लू ऊर्फ सुनील रामेश्वर कुशवाह (२४) आणि त्याचा साथीदार धर्मेंद्रकुमार रामप्रकाश कुशवाह या दोघांनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून जगदीशसिंह कुशवाह यांची ८ मे रोजी आपातापा रोडवरील बंधुगोटा फाट्यानजीकच्या शेतशिवारात धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली होती. या प्रकरणी बोरगावमंजू पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला; मात्र मृतक जगदीशसिंह कुशवाह यांची पत्नी गुड्डन कुशवाह यांनी या खून प्रकरणाचा संशय उत्तर प्रदेशातील रहिवासी कल्लू ऊर्फ सुनील रामेश्वर कुशवाह याच्यावर व्यक्त केल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सदर आरोपीचा शोध घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला व त्याच्या साथीदार या दोघांना उत्तर प्रदेशातील कनोज येथून सोमवारी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी या खुनाची कबुली दिली असून, अनैतिक संबंधाच्या कारणावरूनच हा खून केल्याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत ममताबादे, अमित दुबे यांनी केली.
मृतकाच्या पत्नीने दिली आरोपींची माहिती
मृतक जगदीश कुशवाह यांची पत्नी गुड्डन कुशवाह यांनी त्यांच्या पतीचा खून कल्लू ऊर्फ सुनील रामेश्वर कुशवाह याने केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. यावरून पोलिसांना आरोपींच्या नावाचा खुलासा झाला, एवढेच नव्हे तर आरोपी कुठे राहतो, यासह त्याची इत्थंभूत माहिती पोलिसांना गुड्डन कुशवाह यांच्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली.