कुरुम आरोग्य केंद्र बनले समस्यांचे ‘आगार’
By Admin | Updated: July 20, 2014 02:01 IST2014-07-20T01:34:36+5:302014-07-20T02:01:44+5:30
आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित कुरूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त.

कुरुम आरोग्य केंद्र बनले समस्यांचे ‘आगार’
कुरुम: महिला व बालकांच्या आरोग्यासंबंधी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्ष २00७-0८ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित झालेले येथील गवरजाबाई रामनाथजी सारडा प्राथमिक आरोग्य केंद्र हे सोयी-सुविधांचा अभाव व वैद्यकीय अधिकार्यासंह अनेक पदे रिक्त असल्यामुळे समस्यांचे आगार बनले आहे. येथील आरोग्य केंद्रांतर्गत ३४ गावे असून, ६ उपकेंद्र आहेत. गत काही महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकार्यांची दोन पदे रिक्त आहेत. तसेच १ स्वास्थ्य अभ्यांगता (एल. एच. व्ही.), ५ मलेरिया आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू), १ मुख्यालय आरोग्य सेविका (एएनएमएचक्यू), १ परिचर आदी जागा रिक्त असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ ते ८ महिन्यांपासून करारावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडारे हे मे महिन्यात, तर डॉ. भोपते हे जून महिन्यात आरोग्य केंद्र सोडून गेल्याने माना व शेलुबाजार येथील उपकेंद्रातील डॉक्टरांवर अतिरिक्त भार पडला आहे. येथे महिला वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे गरोदर महिलांची कुचंबणा होते. या केंद्रातील शौचालय व बेसिनचे नळ बंद आहेत. तर काही शौचालय तुंबल्याने आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. प्रसूत महिलांकरिता गरम पाण्यासाठी सौर हिटर आहे; परंतु गरम पाणी उपलब्ध होत नाही. वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे कर्मचार्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.