कृषी विद्यापीठाच्या बीटी कापसाला आली फुले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:40 IST2017-08-23T01:37:02+5:302017-08-23T01:40:12+5:30
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. या बीटीची वाढ जोमदार झाली असून, त्याला फुले, बोंडे धरली आहेत; पण सलग १२ दिवसांपासून कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी संप पुकारल्याने बीटीवर प्रतिकूल परिणाम होत आहेत.

कृषी विद्यापीठाच्या बीटी कापसाला आली फुले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. या बीटीची वाढ जोमदार झाली असून, त्याला फुले, बोंडे धरली आहेत; पण सलग १२ दिवसांपासून कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी संप पुकारल्याने बीटीवर प्रतिकूल परिणाम होत आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जनुक टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या वाणाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या बियाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे. या पिकांची वाढ पाऊस नसताना सूक्ष्म सिंचनाच्या पाण्यावर झाली असून, हे झाड अडीच फुटांचे झाले आहे.
काम बंद आंदोलन
कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. संप असल्याने बीटीला पाणीसुद्धा मिळाले नाही. आवश्यक अन्नद्रव्ये मिळत नसल्याने फुले गळताना दिसत आहेत.