कोंडवाडे रिकामे, गुरे रस्त्यावर
By Admin | Updated: August 12, 2014 01:09 IST2014-08-12T01:09:54+5:302014-08-12T01:09:54+5:30
मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करा!

कोंडवाडे रिकामे, गुरे रस्त्यावर
अकोला : शहरातील रस्त्यांवर जागोजागी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला असताना महापालिकेचे कोंडवाडे मात्र सताड रिकामे पडले आहेत. मोकाट गुरे, श्वानांचा अकोलेकरांना प्रचंड त्रास होत असल्यामुळे प्रभारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी मोकाट गुरांच्या समस्येकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी अकोलेकर करीत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मांडल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा जनावरांमुळे अनेकदा किरकोळ अपघात घडत आहेत. शहरातील मोकाट गुरे, श्वान पकडण्याची जबाबदारी मनपाच्या कोंडवाडा विभागावर असली तरी कोंडवाडा विभागाचे कर्मचारी दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. मोकाट गुरांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून, याविषयी कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे यांच्याकडे असंख्य तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींवर थातूरमातूर कारवाई करून वेळ निभावून नेण्यात कोंडवाडा विभागाचे कर्मचारी पटाईत झाल्याचा आरोप होत आहे. अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणारे लाखो रुपये या विभागावर नाहक खर्च होत असल्याचा सूर जनमानसात उमटत आहे.
** इंधन खर्चावर उधळपट्टी कोंडवाडा विभागाकडे मोकाट गुरे-कुत्रे पकडण्यासाठी एक वाहन (वाहन क्र.५0२८) उपलब्ध आहे. जनावरे पकडण्याच्या नावाखाली या वाहनाच्या इंधन खर्चापोटी महिन्याला हजारो रुपयांची उचल केल्या जाते. मागील तीन महिन्यात ४0 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची उचल मनपातून करण्यात आल्याची माहिती आहे.
** दोन कोंडवाडे अन तेही रिकामे मोकाट गुरे पकडून त्यांना ठेवण्यासाठी दोन कोंडवाडे आहेत. जुने शहरातील शिवाजीनगर व आकोट फैल परिसरातील अशोकनगरमध्ये हे कोंडवाडे असून, त्यामध्ये जनावरेच नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी महापालिकेने चौकीदार नियुक्त केले आहेत.
** नागरिक त्रस्त, मनपा सुस्त अतिक्रमण व स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने लघू व्यावसायिकांसह उपाहारगृह संचालकांना बेदम केले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याने उपाहारगृह संचालकांजवळून दंड वसूल केल्या जात आहे. मनपाच्या कारवाईला कोणाचा विरोध नसला तरी नागरिकांच्या समस्यांकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, मोकाट गुरे व श्वानांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.