किशोर खत्री यांची हत्या गोळय़ा झाडूनच!
By Admin | Updated: November 5, 2015 02:06 IST2015-11-05T02:05:31+5:302015-11-05T02:06:35+5:30
रणजितसिंह चुंगडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

किशोर खत्री यांची हत्या गोळय़ा झाडूनच!
अकोला - शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री यांची हत्या गोळय़ा झाडूनच करण्यात आल्याचे, बुधवारी उघड झाले. रणजितसिंह चुंगडे यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप, किशोर खत्रींचे बंधू दिलीप खत्री यांनी केल्यानंतर, बुधवारी जुने शहर पोलिसांनी चुंगडे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. किशोर खत्री यांच्या मृतदेहाचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या छातीच्या डाव्या भागातून पिस्तुलाची गोळी आरपार गेल्याचे शवविच्छेदनादरम्यान निष्पन्न झाले. मारेकर्यांनी खत्रींचा गळा चिरल्यानंतर, ते जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळत सुटले असावे आणि त्यामुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असावा, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.
बालाजी ट्रस्टच्या मालकीच्या, पूर्वीच्या चित्रा टॉकीजच्या जागेवर उभारण्यात आलेल्या शॉपिंग मॉलमध्ये किशोर मदनलाल खत्री (४५) यांची भागीदारी होती. मुंबईस्थित एका कंपनीने सदर मॉल उभारला आहे. खत्री यांनी धानुका नामक प्रॉपर्टी ब्रोकरच्या माध्यमातून या मॉलमधील बहुतांश गाळे खरेदी केले होते, असे समजते. मॉलच्या उद्घाटनाच्या मुहूर्तावरून सोमवारी बालाजी ट्रस्टचे रणजितसिंह चुंगडे आणि मॉलची उभारणी करणार्या कंपनीच्या अधिकार्यांदरम्यान वाद झाला. तो वाद किशोर खत्री यांनी मिटविला; मात्र त्यानंतर मंगळवारी सायंकाळी खत्री यांची सोमठाणा शेतशिवारामध्ये गळा चिरून व गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली.
या प्रकरणी दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी बुधवारी चुंगडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ व १६९/१५ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके गठित करण्यात आली असून, त्यांनी चुंगडे यांचा शोध सुरू केला आहे. जुने शहर पोलिसांनी या हत्या प्रकरणातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याशिवाय रणजितसिंह चुंगडे यांच्या विश्वजित व बंटी नामक पुत्रांचीही मंगळवार रात्रीपासून चौकशी करण्यात येत आहे.
आज होणार आर्म्स अँक्टचा गुन्हा दाखल
शवविच्छेदन अहवालाची लेखी प्रत पोलिसांना गुरुवारी प्राप्त होणार असून, त्यानंतर चुंगडे यांच्याविरुद्ध आर्म्स अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चुंगडे यांच्या सफारी कारमधून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यामधीलच एका पिस्तुलाचा वापर खत्री यांच्या हत्येसाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.