अपहृत शुभमची खंडणीकरिता हत्या

By Admin | Updated: March 4, 2015 02:23 IST2015-03-04T02:23:33+5:302015-03-04T02:23:33+5:30

आंबोडा गावातील तीन आरोपी जेरबंद.

Killings for the ransom of the hijacked Shubham | अपहृत शुभमची खंडणीकरिता हत्या

अपहृत शुभमची खंडणीकरिता हत्या

आकोट (जि. अकोला): शुभम शिवरकारचे खंडणीकरिताच अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलिसांनी गावातीलच तीन आरोपींना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. शुभमच्या हत्या प्रकरणात चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्या दोघांवर संशय बळावल्याने त्यांना पोलीस खाक्या दाखवून विचारपूस करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीतून हत्येचे गुढ उकलले. त्यानुसार पोलिसांनी शंकर सुरेश कोष्टी, संतोष अण्णा कोमटी, रमेश मनोज अंभोरे (सर्व रा. आंबोडा) यांना अटक करण्यात आली आहे. आंबोडा येथील पोलीस पाटीलचा मुलगा शुभमचे २५ फेब्रुवारीला अपहरण करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आला. तब्बल पाच दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेल्या आरोपींना पैशाची गरज असल्याने त्यांनी शुभमचे अपहरण करून खंडणी मागण्याचा कट चार दिवसांपूर्वी रचला होता. त्यानुसार २५ फेब्रुवारीला शुभमच्या घरासमोरच राहणार्‍या शंकर कोष्टीने पाळत ठेवली. शुभम घराबाहेर खेळत असल्याची माहिती त्याने त्याचा सहकारी रमेश अंभोरेला दिली. कोणाचे लक्ष नसताना रमेश अंभोरेने शुभमला बाजूच्या शेतात नेले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शंकर कोष्टी हा खंडणी मागण्याकरिता नविन सिम आणायला आकोटात आला. या ठिकाणी त्याला त्याची पत्नी भेटल्याने तो परत गावी आला. शुभमचे अपहरण झाल्याच्या घटनेने सर्व गावकरी एकत्र आल्याचे पाहून घाबरलेला शंकर शेतात गेला. या ठिकाणी त्याने सहकार्‍यांना गावातील माहिती दिली. शुभम हा आरोपींशी परिचित असल्याने बिंग फुटेल, या भीतीपोटी तिघांनी शुभमचा गळा दाबला. संतोषने एक पोते आणले. तिघांनीही शुभमला त्या पोत्यामध्ये भरले. त्यानंतर रमेशने पोते विहिरीत नेऊन टाकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कसून तपासानंतर आरोपीचे बिंग फुटल्याने त्यांना अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार किशोर शेळके, प्रेमानंद कात्रे, बाबूराव नवथळे, नारायण वाडेकर, सुरेश ढोरे, अनिल सिरसाट आदींनी केला.

Web Title: Killings for the ransom of the hijacked Shubham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.