भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण
By Admin | Updated: May 25, 2015 02:51 IST2015-05-25T02:51:52+5:302015-05-25T02:51:52+5:30
बाश्रीटाकळीनजीक रेल्वे रुळावर जिवे मारण्याचा प्रयत्न, प्रवाशांनी केली सुटका.

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण
मंगरुळपीर : भारतीय जनता युवा मोर्चाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विनोद जाधव यांचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, शेलूबाजारजवळील चिखली येथे विनोद जाधव यांना काही अज्ञात युवकांनी रविवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास मारहाण केली. यावेळी जाधव यांचे हातपाय बांधून त्यांचे एका चारचाकी वाहनातून अपहरण करण्यात आले. हे वाहन अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळीकडे नेण्यात आले. बाश्रीटाकळीनजीक रेल्वे रुळावर जाधव यांना हातपाय बांधलेल्या अवस्थेत पुन्हा मारहाण करण्यात आली व तेथेच टाकून अपहरणकर्ते त्यांनी आणलेल्या वाहनातून पसार झाले. विनोद जाधव यांनी रेल्वे रुळावरून कसाबसा आपला जीव वाचवत सुटका करून घेतली आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेतच ते बाश्रीटाकळी— मंगरुळपीर रस्त्यापर्यंंत पोहोचले. यावेळी अकोल्याहून मंगरुळपीरकडे जाणार्या बसमधील प्रवाशांना जाधव रस्त्यावर हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसले. प्रवाशांनी बसचालकाला बस थांबविण्यास सांगितले. बाळू नामदेव कांबळे व काही प्रवाशांनी बसमधून उतरून जखमी जाधव यांचे हातपाय सोडविले आणि त्यांना बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये पोहचवले. बाश्रीटाकळी पोलिसांनी जाधव यांना मंगरुळपीर पोलीस ठाण्यात पोहचवले. वृत्त हाती येईपर्यंंंत मंगरुळपीर पोलीस ठाण्यात जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.