अपहरण करून चिमुकल्याची हत्या
By Admin | Updated: February 27, 2015 01:42 IST2015-02-27T01:42:14+5:302015-02-27T01:42:14+5:30
आंबोडा गावातील घटना ; पोत्यात बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला.

अपहरण करून चिमुकल्याची हत्या
आकोट : तालुक्यातील अंबोडा येथील पोलीस पाटलाच्या ८ वर्षीय मुलाचे अज्ञात आरोपीने अपहरण करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे प्रेत एका पोत्यामध्ये बांधून विहिरीत टाकून दिल्याची घटना २६ फेब्रुवारीला उघडकीस आली. आकोट तालुक्यातील आंबोडा येथील आदिवासी समाजातील पोलीस पाटील महेश जानराव शिवरकर यांचा मुलगा शुभम हा २५ फेब्रुवारीला घराबाहेर खेळत होता. खेळत असलेला शुभम आढळत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी गावामध्ये शोध घेतला; परंतु तो दिसला नाही. अखेर महेश शिवरकर यांनी त्याबाबत आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वत्र नाकेबंदी करीत शोध मोहीम सुरू केली. नातेवाईकांनीसुद्धा संपूर्ण परिसर २५ फेब्रुवारीच्या दुपारपासून पिंजून काढला होता. दरम्यान, २६ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास बोर्डी-रामापूर शेत रस्त्यावरील मुज्जमिल यांच्या शेतातील विहिरीत संशयास्पद स्थितीत एक पोते तरंगत असल्याचे काही गावकर्यांना आढळून आले. त्यांनी लगेच ही बाब ग्रामीण पोलिसांना कळविली. ताबडतोब ठाणेदार किशोर शेळके हे त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विहिरीतील पोते बाहेर काढले असता त्यामध्ये अपहृत शुभमचा मृतदेह दिसून आला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त निघाले होते. त्याचप्रमाणे गळा आवळल्याच्या खुणासुद्धा दिसून आल्यात. गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्याचे आई-वडील व नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. पोलिसांनी शुभमचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री आंबोडा गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, ठाणेदार किशोर शेळके, कैलास नागरे यांच्यासह मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; गुरुवारी भादंविच्या ३0२, २0१ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.