अल्पवयीन मुलांनी केली चोरी; एक जण ताब्यात
By Admin | Updated: November 22, 2014 02:07 IST2014-11-22T02:07:44+5:302014-11-22T02:07:44+5:30
१५ वर्ष वयोगटातील तीन मुलांनी चोरी करून ६ हजार रुपयांचा ऐवज केला लंपास.

अल्पवयीन मुलांनी केली चोरी; एक जण ताब्यात
अकोला : खेडकरनगरातील घरामध्ये १५ वर्ष वयोगटातील तीन मुलांनी चोरी करून ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही बाब घरमालकाला समजताच, त्यांनी चोरी करताना एका १५ वर्षीय मुलास रंगेहात पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातील रांदड रेसिडन्सी येथील एका १५ वर्षीय मुलाने त्याच्या खामगाव येथील सहकार्यांच्या मदतीने खेडकरनगरातील राहुल विठ्ठलराव जायले पाटील (३५) यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर चोरी केली. घरात घुसून या मुलांनी कपाटातील तोरड्यांचा जोड, बिजव्यांची एक जोडी, १ ग्रॅम सोन्याचे मणी, असा एकूण ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तीनही मुले चोरी करीत असताना, ही बाब जायले यांच्या शेजारी राहणार्या एका युवकाच्या लक्षात आली. त्याने ही माहिती राहुल जायले यांना दिली. जायले यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, तीनही मुलांनी पळ काढला. त्यापैकी एकास त्यांनी पकडले आणि पोलिस ठाण्यात आणले. पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी मुलास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयासमोर हजर करून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली.