कोरोनाच्या सावटाखाली खरीप हंगाम संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:27+5:302021-05-15T04:17:27+5:30

संजय उमक मूर्तिजापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, ...

Kharif season in crisis under corona! | कोरोनाच्या सावटाखाली खरीप हंगाम संकटात!

कोरोनाच्या सावटाखाली खरीप हंगाम संकटात!

संजय उमक

मूर्तिजापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अख्ख्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाने आरोग्यासह अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्यापैकी कृषी आधारित अर्थव्यवस्था असलेल्या देशातच कृषी व्यवस्था मोडकळीस आली आहे. पैशाच्या अभावी पेरणीपूर्व मशागत कशी करावी, हाच मोठा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

मूर्तिजापूर तालुक्यात सुमारे ७२ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखालील शेतजमिनीचे आहे. बहुतांश शेती कोरडवाहू म्हणजे खरिपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारी आहे. आधीच वीज आणि पाण्याअभावी हैराण झालेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर कोरोनाने मोठे संकट उभे केले आहे. रब्बी हंगामातील कृषी उपज संचारबंदीत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व्यर्थ ठरत आहे. गतवर्षी कोरडवाहू शेतीतील कपाशीच्या पिकाचा हंगाम संपण्याआधीच उलंगवाडी झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार यावर्षी खरीप हंगामात कापूस हेक्टरी ८.१३ क्विंटल, तूर २० क्विंटल, सोयाबीन १०. ४२ क्विंटल, मूग ६.२, क्विंटल उडीद ६. ६४ क्विंटल अशा प्रकारे उत्पन्न झाले असल्याचे म्हटले असले तरी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अहवालापेक्षा जास्त पटीने उत्पन्न घटले आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर थांबल्याने नागरणी, वखरणीच्या कामांना खीळ बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पदरी पैसा नसेल तर शेतकरी बियाणे, खते, जंतुनाशके कसे खरेदी करेल, असे असंख्य प्रश्न विचारणारा शेतकरी हतबल आहे. पेरण्या सुरू होण्यापूर्वी बियाणे, खातांसाठी उडणारी झुंबड थांबवण्यासाठी आजच साठेबाजी न होण्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारची कारखानदारी लॉकडाऊनदरम्यान सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (फोटो)

----------------------------------------

बियाणे खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी

तालुक्यात १५० शेतकरी बचत गट स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून अथवा कृषी केंद्र व्यावसायिकांनी दिलेल्या किंवा कृषी विभागाने जारी केलेल्या लिंकवर जाऊन बियाणे खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे सेतू केंद्र, ऑनलाइन केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

---------------------------------

हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेवर असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळीच आटोपून घ्यावीत. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणांची नोंदणी दिलेल्या लिंकवर करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी निविष्ठा लवकर करून पेरणी वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून अधिक उत्पन्न घेता येईल.

- सुहास बेंडे

तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

--------------------------------------

कपाशीचा पेरा घटणार!

यावर्षी कपाशी फेऱ्यात कमालीची घट होणार असून, सोयाबीन, तूर पेऱ्यात प्रचंड वाढ होणार आहे. गतवर्षी पावसाचा अभाव व बोंड अळीच्या आक्रमणामुळे कपाशी उत्पादनात घट झाली आहे. पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपला असून, पेरणीपूर्व मशागत लॉकडाऊन असल्याने मजुरांअभावी खोळंबली आहे.

Web Title: Kharif season in crisis under corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.