खारघरचा कार्यक्रम नियोजनशुन्य; राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
By रवी दामोदर | Updated: April 24, 2023 19:15 IST2023-04-24T19:15:31+5:302023-04-24T19:15:48+5:30
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषदेतून मागणी

खारघरचा कार्यक्रम नियोजनशुन्य; राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
अकोला : खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्मघातामुळे तब्बल १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रम नियोजन शुन्य असल्यानेच दुर्घटना घडली आहे. एखाद्या कार्यक्रमात काही घडले, तर त्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला जातो, त्यानुसार महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवार, दि.२४ एप्रिल रोजी स्वराज्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रसंगी खारघरचा कार्यक्रम भर उन्हात का घेतला, १३ कोटी रुपये खर्चून ढीसाळ नियोजन कसे, आदी प्रश्न उपस्थित केले. तसेच या घटनेची सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली. पत्रकार परिषदेला कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, साजीद खान पठाण, राज्य सचिव प्रकाश तायडे, महेंद्र गवई, डॉ. सुधीर ढोणे, निखिलेश दिवेकर, अंकुश गावंडे, मुजाहिद खान आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा!’
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खारघर येथे भर उन्हात कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात पाण्याची व्यवस्था अपूरी होती, तसेच कार्यक्रम नियोजनशुन्य होता. त्यामुळेच दुर्घटना घडली. या घटनेची नैतीक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रसंगी केली.