खामगाव-जालना मार्गाला सिग्नल नाही
By Admin | Updated: February 27, 2015 01:25 IST2015-02-27T01:25:00+5:302015-02-27T01:25:00+5:30
बुलडाणा जिल्हावासीयांची निराशा; जिल्ह्यातील रेल्वेच्या विकासाबाबत धोरणात्मक घोषणा नाही.

खामगाव-जालना मार्गाला सिग्नल नाही
बुलडाणा : खामगाव-जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत रेल्वे अर्थसंकल्पात कुठलेही सुतोवाच नसल्यामुळे जिल्हावासीयांची निराशा झाली. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असलेल्या या रेल्वे मार्गाला भाजपा सरकारच्या काळात ह्यअच्छे दिनह्ण येतील, हे आश्वासनही या निमित्ताने फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे लोकआंदोलन समितीकडून नवे सरकार आल्यापासून सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांचे प्रश्न मांडून जालना रेल्वे मार्गाबाबत राज्यशासनाने हमीपत्र द्यावे, अशी मागणी केली होती. राज्यशासनाने या मार्गाबाबत ५0 टक्के खर्चाचे हमीपत्र केंद्र सरकारला दिले असते तर गुरूवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात खामगाव-जालना मार्गाविषयी काही घोषणा झाली असती. विशेष म्हणजे बुलडाणा अर्बनने या मार्गासाठी कर्ज रोखे उभारण्याची घोषणा केली होती. खामगाव-जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बर्हाणपूर-सोलापूर या ४५0 कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली.या मार्गाला मंजुरी मिळाली असती तर खामगाव-चिखली-जालना असा ६0 कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती. विशेष म्हणजे चिखली-मलकापूर अशा कुठल्याही मार्गाची मागणी नसताना २00९ च्या अर्थ संकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली; मात्र त्या दृष्टीने पुढे काम झाले नाही. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी रेले अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त केली. रेल्वे अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांसंदर्भातील विविध प्रश्न, नव्या गाड्यांचा थांबा, नव्या गाड्या सुरू करणे, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा अशा अनेक प्रश्नांबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना निवेदन दिले होते. ते महाराष्ट्रातील असल्याने या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्या जाईल, असे वाटले होते; मात्र रेल्वेमंत्र्यांनी निराशा केली असल्याचे जाधव यांनी सांगीतले.