पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By संतोष येलकर | Updated: March 18, 2024 15:24 IST2024-03-18T15:24:38+5:302024-03-18T15:24:59+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून, तातडीने माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा आदी उपस्थित होते.
आचारसंहिता कालावधीत बँकांची भूमिका महत्वाची आहे. निवडणूक काळात बँकांनी संशयास्पद व्यवहार संदर्भात अहवाल (एसटीआर) सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत. त्यानुषंगाने बँकांमार्फत असे व्यवहार होत आहेत किंवा कसे, एखाद्या शाखेत अचानक पैशाची मागणी वाढल्यास त्यावर नजर ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसंघात कुठेही पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.