कापशी हैदोस प्रकरणाची चौकशी सुरू

By Admin | Updated: April 27, 2015 01:39 IST2015-04-27T01:39:28+5:302015-04-27T01:39:28+5:30

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांचे घेतले बयाण

Kapasi Hadhos case inquiry launched | कापशी हैदोस प्रकरणाची चौकशी सुरू

कापशी हैदोस प्रकरणाची चौकशी सुरू

अकोला - कापशी येथे अक्षय्य तृतीयेच्या रात्रभर पोलिसांनी घातलेल्या हैदोसप्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी रविवारी सुरू केली. कापशी गावात जाऊन त्यांनी ग्रामस्थांचे बयाण नोंदविण्यास प्रारंभ केला असून, आणखी काही दिवस ही चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती दिली. कापशी गावाबाहेर असलेल्या तलावाच्या काठावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार खेळणार्‍यांची यात्राच भरली होती. या ठिकाणी छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जुगारींनी हल्ला केल्याचे तसेच हारजीतच्या कारणावरून पोलीस आणि जुगारींमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले. यामध्ये तब्बल १५ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळताच त्यांच्याही पथकाने तातडीने कापशी गाव गाठले. साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात गावात तब्बल १00 वर पोलीस कर्मचार्‍यांनी हैदोस घातला. या प्रकारामुळे संपूर्ण गाव दहशतीत असल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे आणि पोलीस अधीक्षकांनी गावाला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निकेश खाटमोडे पाटील यांना आदेश दिला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, रविवारी गावातील बहुतांश महिला-पुरुषांचे बयाण त्यांनी चौकशी दरम्यान नोंदविले. कापशी येथे घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण करून अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Kapasi Hadhos case inquiry launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.