कावड-पालखी उत्सव आज
By Admin | Updated: September 7, 2015 01:50 IST2015-09-07T01:50:22+5:302015-09-07T01:50:22+5:30
हर्रऽऽऽ बोला महादेवच्या गजरात पालख्या रवाना; डाबकी रोडवासीयांची सर्वात मोठी कावड.

कावड-पालखी उत्सव आज
अकोला: श्रावण पर्व म्हटले की, भाविकांच्या भक्तीला उधाण येते. श्रावणातील चौथ्या सोमवारी अकोलेकरांचे आराध्य दैवत राजराजेश्वराला शिवभक्त व अनेक कावड मंडळांतर्फे भक्तीचा अभिषेक करण्यात येतो. त्यासाठी कावड मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रविवारीच शहरातील कावड व पालख्या गांधीग्रामसाठी रवाना झाल्या आहेत. यंदाच्या पालखी व कावड यात्रेत डाबकी रोडवासीयांची ४५१ भरण्यांची कावड विशेष आकर्षण राहणार आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात सार्जया होणार्या कावड यात्रा उत्सवाला आगळीवेगळी परंपरा आहे. पूर्वी श्रावणातील शेवटच्या सोमवारी कावड यात्रा आयोजित करण्यात येत असे. अकोल्यापासून १७ किमी अंतरावरील गांधीग्राम येथून पवित्र पूर्णा नदीचे जल आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची परंपरा १९४२-४३ सालापासून अविरत सुरू आहे. शेवटच्या सोमवारी अनेक कावड मंडळांच्या कावड व त्यांनी साकारलेले देखावे नागरिकांना आकर्षणाचा विषय असतो. शहरातील डाबकी रोडवासीयांनी कावडयात्रेची १ सप्टेंबरपासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या चार वर्षांपासून या मंडळातर्फे ४५१ भरण्यांची कावड पायदळ वारी सुरू आहे. कावडयात्रेला घेऊन दरवर्षी डाबकी रोड वासीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथील कार्यकर्ते कावड व भरण्यांची बांधणी करतात. मंडळ कुणाकडूनही देणगी न स्वीकारता हे धार्मिक कार्य करीत आहे. दोन वर्षांपूर्वीच मंडळाने २८ हजारांची भरणे खरेदी केली आहेत. भरणे बांधण्यासाठी सतत मंडळाचे कार्यकर्ते चार-पाच दिवस राबतात. १0 भरण्याचे मिळून २४ गुच्छे तर ७ भरण्यांची ३0 गुच्छे बांधण्यात येतात. यंदाची कावड १११ फूट लांब व १६ फूट रुंद राहणार आहे. या कावड यात्रेमध्ये डाबकी रोड परिसरातील दोन ते अडीच हजार युवक सहभागी होतात. रविवारी दुपारी १.३0 वाजता ही सर्वात मोठी कावड डाबकी रोडवरून गांधीग्रामसाठी रवाना झाली. पूर्णामायचे जल भरण्यांमध्ये भरून ही कावड रविवारीच मध्यरात्रीच्या सुमारास राजराजेश्वर मंदिरासाठी रवाना होईल. सोमवारी दुपारी १ वाजता ही कावड राजराजेश्वर मंदिरात पोहोचेल.
यात्रेत १३५ पालख्या सहभागी होणार
महाराष्ट्रात कुठेही साजरा न होणारा पालखी व कावड यात्रा उत्सव केवळ अकोल्यात साजरा होतो. दरवर्षी या उत्सवाला भव्य व व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. यंदाही या यात्रेमध्ये १३५ च्यावर पालखी मंडळे सहभागी होणार असल्याची माहिती राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी दिली.
राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना स्वागतासाठी सज्ज
अकोलेकर नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा धार्मिक उत्सव असलेल्या कावड व पालखी उत्सवाची तयारी रविवारी दिवसभर सुरू होती. अकोला ते गांधीग्राम या १७ कि.मी. मार्गावर मोक्याच्या ठिकाणी पथदिवे लावण्यात आले आहेत. पालखीच्या स्वागतासाठी विविध सामाजिक व धार्मिक संघटना सज्ज झाल्या आहेत. पालखी मार्गावर या संघटना व राजकीय पक्षांनी आपले शामियाने उभारले आहेत
शिवभक्तांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथके!
कावड उत्सवाच्या पृष्ठभूमीवर गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पात्रात शिवभक्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत रविवारी रात्रभर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक सज्ज होते. मदत व शोध कार्यासाठी रबरबोट, लाइफ ज्ॉकेट, लाइफ रिंग, रोपवे व इतर साहित्यासह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. तसेच पूर्णा नदी काठासह पात्रात आपत्कालीन दिव्यांची व्यवस्था करण्यात आली.