७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त
By Admin | Updated: July 24, 2014 23:00 IST2014-07-24T23:00:03+5:302014-07-24T23:00:03+5:30
अकोला व वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षात एकूण ७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त केला आहे.

७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त
वाशिम: महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू झाल्यानंतर अकोल्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अकोला व वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षात एकूण ७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त केला आहे.
राज्य शासनाने २0 जुलै २0१२ रोजी राज्यात गुटखा बंदी केली आहे. गुटखाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनावर सोपविली आहे. वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने अकोला येथूनच वाशिमच्या कारभाराचा गाडा हाकला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सद्यस्थितीत वाशिम व अकोला जिल्ह्यातील २४00 व्यापार्यांना व्यवसायाचे परवाने दिले आहेत. तर तीन हजार लघु व्यावसायिकांची नोंदणी या विभागाकडे आहे. २0 जुलै २0१२ ते २0 जुलै २0१४ या दोन वर्षात गुटखाबंदीचे आदेश असतानाही गुटख्यांच्या काळाबाजाराला ब्रेकच नव्हता. अन्न व औषध प्रशासनाने या दोन वर्षात गुटखा विक्रीविरोधात कारवाया केल्या आहेत. गुटखा जप्तीच्या एकूण ७४ कारवाया केल्या असून ६२ दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी २0 प्रकरण न्यायालयात दाखल असून सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. ६२ लाख १४ हजार ३९८ रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एकिकडे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई तर दुसरीकडे गुटखाकिंगचा गुटख्याचा काळाबाजार जिल्ह्यात पाय रोवत असल्याचे दिसून येते. वाशिम येथे अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने जिल्ह्यात बंदीतही गुटख्यातून चांदीच होत असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यात रिसोड येथे गुटख्याचा साठा अनेकवेळा पकडण्यात आला आहे. या बाबीने रिसोड हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.