रोजगार मेळाव्यांतून युवकांना मिळाला रोजगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 02:08 IST2016-03-29T02:08:06+5:302016-03-29T02:08:06+5:30
वर्षभरात १५ हजार हातांना काम; ८0 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण.

रोजगार मेळाव्यांतून युवकांना मिळाला रोजगार!
बुलडाणा: कुशल कामगारांना रोजगाराची संधी व उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यास सुरुवात केली. २0१५-१६ या वर्षात राज्यभरात १३१ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यातून जवळपास १५,२४८ युवकांना रोजगार पुरविण्यात आला असल्याची माहिती शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.
रोजगार व स्वयंरोजगारासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात अशी ५0 केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी ३५ जिल्हा स्तरावर, सहा विद्यापीठ स्तरावर, आठ आदिवासी विभागाकरिता तर एक विशेष केंद्र शारीरिकदृष्ट्या विकलांग असणार्या व्यक्तीसाठी आहे.
या केंद्रांच्या माध्यमातून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत राज्यभरात २0१५-१६ मध्ये केवळ १३१ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील लहान-मोठय़ा ७३३ उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला. या मेळव्यांचा ५४ हजार ९७५ बेरोजगारांनी लाभ घेतला. यापैकी १५२४८ युवकांना रोजगार पुरविण्यात आला.
राज्य शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत वर्षभरात ८0६४६ युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यात १३८५८ बेरोजगारांना प्रोत्साहित करण्यात आले. शिवाय शिकाऊ उमेदवार म्हणून ५४ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. तर १२७३९ जणांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.