आता अनधिकृत धार्मिक स्थळांवर चालणार जेसीबी!

By Admin | Updated: January 14, 2015 01:18 IST2015-01-14T01:18:25+5:302015-01-14T01:18:25+5:30

साहाय्यक पोलीस अधीक्षक मुंढे, मनपा उपायुक्त चिंचोलीकर यांची माहिती.

JCB will now run on unauthorized religious places! | आता अनधिकृत धार्मिक स्थळांवर चालणार जेसीबी!

आता अनधिकृत धार्मिक स्थळांवर चालणार जेसीबी!

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार २00९ नंतर सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासाठी लवकरच विशेष मोहीम घेण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य शासनाने २00९ पूर्वीची आणि नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये १९६0 ते २00९ या कालावधीमध्ये उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात राज्यस्तरीय समिती निर्णय घेणार आहे आणि २00९ नंतर सार्वजनिक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळांनी अतिक्रमण केले, त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती निर्णय घेणार आहे. धार्मिक स्थळे ही अधिकृत आहेत की अनधिकृत, यासाठी संबधित संस्थांना महापालिकेकडे कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जी धार्मिक स्थळे अधिकृत असतील, त्यांच्याकडे महापालिकेची रीतसर परवानगी किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील, तर ती हटविण्यात येणार नाहीत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिली. साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले, एखादे धार्मिक स्थळ हटविण्यासंदर्भात अडचण येत असेल, तर त्याबाबत जिल्हास्तरीय समिती निर्णय घेईल. शहरामधील चौकाचौकांमध्ये धार्मिक स्थळांनी अतिक्रमण केलेले आहे. एवढेच नाही तर शहरातील गल्लीबोळांमध्ये देवी-देवता, संत-महात्मे आणि थोर पुरुषांची छायाचित्रे असलेले फलक उभारण्यात आले आहेत. या धार्मिक स्थळांमध्ये घुसून समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या घटनासुद्धा अनेकदा घडतात. धार्मिक तेढ निर्माण केली जाते. या विशेष मोहिमेमुळे या प्रकारांना कुठे तरी आळा बसेल. तथापि, कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, असेही डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले.

Web Title: JCB will now run on unauthorized religious places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.