जावयाची हत्या करणा-या साळय़ास जन्मठेप!
By Admin | Updated: December 27, 2016 02:30 IST2016-12-27T02:30:42+5:302016-12-27T02:30:42+5:30
सहा महिन्यांमध्येच प्रकरण काढले निकाली.
_ns.jpg)
जावयाची हत्या करणा-या साळय़ास जन्मठेप!
अकोला, दि. २६- किरकोळ वादातून जावयाची धारदार चाकूने भोसकून हत्या करणार्या साळय़ास तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयाने सोमवारी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. सहा महिन्यांमध्येच न्यायाधीश जाधव यांनी प्रकरण निकाली काढले, हे येथे विशेष. हरिहरपेठेतील पोलीस चौकीजवळ १७ मार्च २0१५ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजतादरम्यान आरोपी सय्यद चाँद सय्यद मेहमूद याने त्याचा जावई व व्याही मजीद खा सखावत खा याच्यासोबत तुझ्या घरातील सर्व लोक माझ्या घरी येतात; परंतु मला तुझ्या घरी येऊ दिल्या जात नाही, या कारणावरून वाद घातला आणि धारदार चाकूने त्याच्या मांडीवर वार केले. यावेळी पोलीस कर्मचारी विजय सिरसाट, वाहतूक पोलीस रवी खंडारे, सविता गेडाम, ज्योती माहोरे, होमगार्ड सुरेंद्र मेहरे हरिहरपेठेतील पोलीस चौकीजवळ नाकाबंदी करीत असताना, त्यांना मजीद खा याच्या ओरडण्याचा आवाज आला. हे सर्व पोलीस कर्मचारी आवाजाच्या दिशेने धावले असता, त्यांना आरोपी सय्यद चाँद हा मजीदवर चाकूने वार करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी लगेच आरोपी सय्यद चाँदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाकूही जप्त केला आणि जखमी मजीद खा याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी सय्यद चाँद सैयद मेहमूद याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. जखमी मजीदच्या मांडीची महत्त्वाची रक्तवाहिनी कापल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष केदासे यांनी केला. त्यांनी ९ जून २0१६ रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हत्या प्रकरणाची सुनावणी तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने एकूण आठ साक्षीदार तपासले. आरोपी सय्यद चाँद याच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आणि ५00 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाचीही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली.
यामुळे केली होती हत्या
आरोपी सय्यद चाँद याची बहीण मृतक मजीदची पत्नी आहे आणि आरोपीची मुलगीसुद्धा मृतकच्या मुलाला दिली आहे. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाचे आरोपीकडे व आरोपीचे मृतकाकडे नेहमी येणे-जाणे असायचे; परंतु आरोपी सय्यद चाँद हा नेहमीच मृतकाच्या घरी दारू पिऊन यायचा आणि हैदोस घालायचा. त्यामुळे मृतक व त्याचे नेहमीच वाद होत असत. मृतकाने त्याला त्याच्या घरी येण्यास मज्जाव केला होता. याचा राग आरोपी सय्यद चाँदच्या मनात होता. त्यामुळे त्याने चाकूने भोसकून मजीद खा याची हत्या केली होती.