‘जलयुक्त’ची गती मंदावली!

By Admin | Updated: May 16, 2017 01:55 IST2017-05-16T01:55:43+5:302017-05-16T01:55:43+5:30

जलयुक्तची कामे लोकसहभागातून; निधी मुरला कुठे?

'Jalukta' slowed down! | ‘जलयुक्त’ची गती मंदावली!

‘जलयुक्त’ची गती मंदावली!

विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोट तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे करण्यात आली असल्याचे संबंधित यंत्रणेने राज्य पातळीवरील मूल्यमापन समितीला कळविले होते. प्रत्यक्षात मात्र दोन वर्षांत अनुक्रमे १४८.०० लाख व ५४१.३६ लाख खर्च झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्यामुळे जलयुक्तमधून विविध कामांवर खर्च झालेल्या निधीचे आॅडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसहभागातून कामे झाल्याचा गवगवा करण्यात आला, तर दुसरीकडे कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शासकीय निधीतून खर्च केलेल्या कोणत्याही कामात पाणी साठलेच नाही. त्यामुळे हा निधी मुरला कुठे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अकोट तालुक्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात विविध गावांची निवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्वच कामे लोकसहभागातून झाल्याचे दर्शविण्यात आले. लोकसहभागातून कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे अहवाल खुद्द अधिकाऱ्यांनी राज्य स्तर मूल्यमापन समितीसमोर सादर केले. त्यानंतर मात्र यावर्षी सन २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती घेतली असता, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये २३ गावांची निवड करण्यात आली होती. या २३ गावांकरिता ७५९ कामे घेण्यात आली. त्यापैकी २४२ कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली व १६१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. केवळ ११३ कामांवर १४८.०० लाख खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय, सन २०१५-१६ मध्ये ३५ गावे योजनेत सहभागी झाली होती. त्यांपैकी ३३ गावे जलयुक्त झाली आहेत. या ३३ गावांमध्ये २३५ पैकी २०४ कामे करण्यात आली असून, या कामांवर ५४१.३६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.
या योजनेला सन २०१५-१६ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. महसूल व कृषी विभागाने खोलीकरण व रुंदीकरणाची बहुतांश कामे करून अनेक गावे पाणीदार केली होती. विशेष म्हणजे, जलसंधारण व संवर्धनासाठी झपाटलेल्या गावकऱ्यांनी जल चळवळ उभी करीत मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे केली होती. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी वाचेल, अशी अपेक्षा होती. सर्व कामे ही लोकसहभागातूनच झाली असल्याचा गवगवा केला असताना शासनाच्या दप्तरी मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याची आकडेमोड समोर आली आहे. त्यामुळे कोणती कामे लोकसहभागातून झाली व कोणत्या कामांवर शासकीय निधी खर्च करण्यात आला, याचे आॅडिट होऊन जलयुक्त शिवार योजनेमधील पारदर्शकता जनतेसमोर येणे गरजेचे झाले आहे.

अकोट तालुका : १९ गावांची निवड
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ करिता अकोट तालुक्यात १९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंप्री खुर्द, खासबाग, सर्फाबाद, चोरवड खु., गोखी, बेलुरा, बोर्डी, शहानूर प्र. नरनाळा, रामापूर, कुंड, बोरी, मिर्झापूर, जऊळखेड बु., पुंडा, देवर्डा, टाकळी बु.,पळसोद, दिनोडा, गरसोळी या गावांचा समावेश आहे. या गावात शिवारफेरी घेऊन पाण्याचा ताळेबंद काढत गाव आराखडे जिल्हा समितीच्या मान्यतेकरिता १३ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, तसेच सविस्तर अंदाजपत्रकांना २० मेपर्यंत प्रशासकीय मंजुरीस सादर करावे व त्यानंतर कामे सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Web Title: 'Jalukta' slowed down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.