जय शंभुराजे... जयघोष करीत ढोलताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा
By नितिन गव्हाळे | Updated: May 14, 2024 22:12 IST2024-05-14T22:11:13+5:302024-05-14T22:12:00+5:30
छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव

जय शंभुराजे... जयघोष करीत ढोलताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा
अकोला : टाळ-मृदुंगाचा नाद, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा एकच जयघोष करीत, मंगळवार १४ मे रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून छावा संघटनेच्या वतीने दिमाखात शोभायात्रा काढण्यात आली.
कोरोना आणि गतवर्षी दंगलीची संचारबंदीमुळे तीन वर्षे छत्रपती संभाजी महाराज जयंती शोभायात्रा खंडित झाली होती. मात्र, यंदा जल्लाेष व उत्साहात छावा संघटनेने शोभायात्रा काढली. सर्वप्रथम आमदार रणधीर सावरकर, लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, भाजप शहराध्यक्ष जयंत मसने, डॉ.दीपक मोरे, डॉ.संजय सरोदे, डॉ.श्रीराम लाहाेळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन व हारार्पण करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.
शोभायात्रेच्या अग्रस्थानी अश्व, टाळ-मृदुंगाच्या तालावर पावली खेळणारी मुले, अश्वांवर छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील बालके आणि फेटे परिधान केलेल्या युवती होत्या. सामाजिक संदेश देणारे १५ चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज घेतलेल युवक छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत होते. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, अकोट रोड, शहीद अब्दुल हमीद चौक, टिळक रोड मार्गाने होत, सिटी कोतवाली चौकात पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा गांधी रोडमार्गे खुले नाट्यगृह येथे पोहोचली.
या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला, तसेच शोभायात्रेतील नागरिकांसाठी अल्पोपहार, चहा, शरबत, जलपानाचीही व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, अरविंद कपले, अनिरुद्ध भाजीपाले, ओमप्रकाश सावल, डॉ.हर्षवर्धन मालोकर, प्रदीप खाडे, रजनीश ठाकरे यांच्यासह निवृत्ती वानखडे, बबलू पाटील वसू, डॉ.संतोष भिसे, गोपालराव गालट, मनोहर मांगटे पाटील, गोपाल पाटकर, बाळासाहेब लाहाेळे, श्याम कोल्हे, प्रवीण बानेकर, परीक्षित बोचे, योगेश गोतमारे, पंकज कौलखेडे, गणेश इंगळे, संजय घोगरे, बाबू पाटील, देवेंद्र मोहोकार, संतोष भोरे, सोनू गिरी, निखिल श्रीनगर, अमोल हिंगणे, बबलू पाटील-मांगटे, नितीन चव्हाण, वसंतराव पोहरे, बाळासाहेब भागवत, पंजाब भागवत, शैलेश भाकरे, संदीप वाकोडे, रितेश खुमकर, श्याम कुलट, चेतन लोखंडे, संदीप कुलट गजानन भारती, सूरज कावळे आदी सहभागी झाले होते.
हवेतील साधू, पोटात तलवार असलेला चित्ररथ आकर्षण
छावाच्या शोभायात्रेमध्ये हवेत तपश्चर्या करणाऱ्या साधूसह पाेटात तलवार घुसविलेल्या युवकाचा देखावा विशेष आकर्षण ठरला होता. हा देखावा पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
आदिवासी नृत्य व वाद्यांनी आणली रंगत
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष करून अकोट तालुक्यातील सातपुडा भागातील आदिवासी बांधवांना पाचारण करण्यात आले होते. आदिवासी महिला व पुरुषांनी त्यांच्या पारंपरिक वाद्यांवर नृत्य करीत नागरिकांचे लक्ष वेधले.