बाळापूर नव्हे, हे तर ‘खड्डापूर’
By Admin | Updated: August 11, 2014 00:52 IST2014-08-11T00:34:08+5:302014-08-11T00:52:25+5:30
बाळापुरातील बसस्थानक चौक, प्रमुख मार्ग व इतर मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने 'रस्त्यावर खड्डे की खड्डय़ांत रस्ते' असा संभ्रम

बाळापूर नव्हे, हे तर ‘खड्डापूर’
बाळापूर : अकोला जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील महत्त्वाचे शहर व व्यापारी पेठ असलेल्या बाळापुरातील बसस्थानक चौक, प्रमुख मार्ग व इतर मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने 'रस्त्यावर खड्डे की खड्डय़ांत रस्ते' असा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शहराला 'बाळापूर म्हणावे की खड्डापूर', असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
वीटभट्टय़ांसाठी केवळ जिल्हय़ातच नव्हे, तर विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या बाळापुरातील रस्ते खड्डय़ांनी व्यापले आहेत. शहरातून जाणारा अकोला-खामगाव मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे मुख्य मिरवणूक मार्ग, तहसील मार्ग, मन नदी ते म्हैस नदी दरम्यानचा मार्ग अशा विविध मार्गांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारक व पादचार्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाने २0११ मध्येच या मार्गांचे डांबरीकरण केले होते. परंतु अल्पावधीतच या रस्त्यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आजरोजी दिसून येत आहे.बाळापूर बसस्थानक परिसरातही खड्डय़ांचे साम्राज्य पसरलेले दिसते. नगर परिषदेने स्वत:च्या जागेवर बसस्थानक बांधून नाममात्र भाडेतत्त्वावर ते एसटी महामंडळाला दिले आहे. गत चार वर्षांपासून बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी थेट बसस्थानक परिसरात जमा होते. त्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण होऊन त्यात घाण पाणी साचले आहे. पाण्यामुळे खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा बसेस या खड्डय़ांमधून गेल्याने प्रवाशांना जोरदार हादरे बसतात. बसस्थानक परिसराच्या दुरुस्तीची जबाबदारी एसटी महामंडाळाची असून, परिसरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली बांधून देण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्याने बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्याची समस्या निकाली निघण्याची सुतरामही शक्यता नाही. दोघांकडूनही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असून, त्यात सामान्य बाळापूरकर भरडल्या जात आहेत. साचलेल्या घाण पाण्यामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुरुस्तीनंतर अल्पावधितच रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसेच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.