दलित वस्तीतील रस्त्याच्या कामाची चौकशी करणार
By Admin | Updated: September 27, 2014 00:52 IST2014-09-27T00:52:15+5:302014-09-27T00:52:15+5:30
बाश्रीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील दलित वस्तीत काँक्रीट रस्त्याचे निकृष्ट काम.

दलित वस्तीतील रस्त्याच्या कामाची चौकशी करणार
बाश्रीटाकळी : तालुक्यातील लोहगड येथील दलित वस्तीत २0 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकार्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील लोहगड येथे समाजकल्याण विभागाद्वारे दलित वस्तीसुधार योजनेतून वार्ड क्र. १ मध्ये २0 लाख रुपयांच्या काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. सदर कामाचे कंत्राट माजी जि.प. पदाधिकार्याच्या मुलाच्या नावावर देण्यात आले आहे. सदर काम हे त्याच परिसरात राहणारे व्यक्ती करीत असून, रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत रेतीचा वापर होत आहे. या रस्त्याच्या कामाच्या अंदाजपत्रकात कामासाठी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील रेतीचे दर देण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात या कामात मातीमिश्रीत चुरीचाच वापर होत आहे. रस्त्याचे काम कंत्राटदार स्वत: करीत नसून दुसरीच व्यक्ती हे काम करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत, या कामाची त्वरित चौकशी होऊन संबंधिताविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.