भरतीया निवासस्थान चाेरी प्रकरणाचा फुटेजच्या आधारे तपास; संशयितांची झाडाझडती
By सचिन राऊत | Published: May 6, 2024 12:21 AM2024-05-06T00:21:37+5:302024-05-06T00:22:14+5:30
चाेरीचा एकूण मुद्देमाल सुमारे ४३ लाखांचा; पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
सचिन राऊत, अकोला: खदान पोलिस स्टेशन हद्दीतील गाैरक्षण राेडवरील भरतीया निवासस्थानी अज्ञात चाेरट्यांनी हैदाेस घालीत धाडसी चाेरी करून ४३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्यानंतर खदान पाेलिसांनी गुन्हे दाखल करून आराेपींचा शाेध सुरू केला आहे. या परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गाेळा करण्यात आले असून, त्या आधारे संशयितांची झाडाझडती घेण्याचे कामही पाेलिसांनी सुरू केले आहे.
गाैरक्षण राेडवरील चार बंगल्याच्या समाेरील रहिवासी राणी ब्रिजमाेहन भरतीया यांच्या आलिशान निवासस्थानातून अज्ञात चाेरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ४३ लाख रुपयांच्या ऐवज लंपास केला हाेता. हा प्रकार शनिवारी पहाटे कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. चोरट्यांनी आवारभिंतीला शिडी लावून बंगल्याच्या मागील बाजूने आतमध्ये प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
दरम्यान, या धाडसी घरफोडीमुळे पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता पाेलिसांनी या राेडसह बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या तीन राेडवरील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून, या आधारे अज्ञात चाेरट्यांचा शाेध सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांनी पळ काढताना सोन्या-चांदीचे रिकामे झालेले बॉक्स व काही इतर साहित्य बंगल्याबाहेर फेकून दिल्यानंतर ठसेतज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले असून, त्या आधारेही तपास सुरू करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------चाेरट्यांची माहिती घेणे सुरू
या चाेरी प्रकरणात खदान पाेलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही संशयित चाेरट्यांचा डेटा गाेळा करणे सुरू केले आहे. या चाेरट्यांचा शाेध घेण्याचे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान असले तरीही चाेरट्यांना लवकरच बेड्या ठाेकण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.