हातरुण परिसरात अवैध वाळू वाहतूक
By Admin | Updated: April 25, 2017 20:24 IST2017-04-25T20:24:35+5:302017-04-25T20:24:35+5:30
हातरुण : परिसरात वाळूची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. अवैध वाळू वाहतूकविरोधात धडक मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हातरुण परिसरात अवैध वाळू वाहतूक
हातरुण : परिसरात वाळूची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. अवैध वाळू वाहतूकविरोधात धडक मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बाळापूर तालुक्यातील हातरुण, निंबा फाटा, धामणा, सोनाळा, उमरी, आडसूल, अंदुरा, हाता, कंचनपूर, बादलापूर, लोणाग्रा, मालवाडा परिसरात रेतीची चोरटी वाहतूक सुरू असून, याकडे महसूल विभागाचा कानाडोळा होत आहे. बोरगाव वैराळे गावानजीक असलेल्या उमरी पेडावरून रेतीची उचल करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची वाहतूक करीत आहेत. परिसरात वाळू माफिया सक्रिय झाले असून, वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
वाळूची वाहतूक होत असलेल्या उमरी पेडाबाबत महसूल विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. एका ट्रॅक्टरची रॉयल्टी काढून त्याच रॉयल्टीवर दोन तीन वेळा वाळू वाहतूक केल्या जात आहे. रॉयल्टीची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने वाळू माफियांचे फावले आहे. हातरुण येथील तलाठी कार्यालयासमोरून वाळूची वाहतूक सुरू असून, हातरुण तलाठी कार्यालय अनेक वेळा कुलूपबंद असते. वाळू वाहतुकीची वाहने परिसरातील गावातून सुसाट धावत असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीच्या त्रासाला नागरिक वैतागले असून, वाळूच्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. सध्या परिसरात घरकुल तसेच बांधकामे सुरू असून, त्यासाठी आवश्यक असणारी वाळू भरलेली ट्रॉली परिसरात २५०० ते ३००० रुपयांत विकले जात आहे. खुलेआम वाळू वाहतूक होत आहे. वाळूचा उपसा सुरूच असल्याने रेती घाटाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या वाळू घाटाची पाहणी करून अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे. वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी विठ्ठल वैराळे यांनी केली आहे.