दलित वस्तीचा निधी परस्पर देणा-या बीडीओंची चौकशी
By Admin | Updated: May 12, 2017 08:24 IST2017-05-12T08:24:59+5:302017-05-12T08:24:59+5:30
अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर पंचायत समितीमधील प्रकार

दलित वस्तीचा निधी परस्पर देणा-या बीडीओंची चौकशी
अकोला : सहायक गटविकास अधिकाऱ्यांना वगळून दलित वस्ती विकास निधीतून कोट्यवधी रुपयांचे वाटप करणाऱ्या जिल्ह्यातील तीन गटविकास अधिका-यांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करून चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या गटविकास अधिका-यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती माधुरी गावंडे, रेखा अंभोरे, देवका पातोंड यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
शासनाने सहायक गटविकास अधिकारी पद निर्माण करतानाच त्या पदाला अधिकारही दिले आहेत; मात्र त्यांचे अधिकार डावलून अनेक फायली त्यांच्याकडे सादरच केल्या जात नाहीत. त्यातच अनेक आर्थिक खर्चाच्या फायलींचा समावेश आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. तरीही गटविकास अधिकाऱ्यांनी दलित वस्ती विकास योजनेचा निधी संबंधित अभियंता आणि स्वत: वितरित केला. याबाबत जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मुद्दा उपस्थित केला. हा प्रकार अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये सुरू असल्याचे उपस्थित सहायक गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा गंभीर प्रकार आहे, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करा, अहवालासाठी मुदत निश्चित करण्याची जोरदार मागणी सदस्यांनी केली. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौकशी करून अहवाल देतील, असे निर्देश सभेत देण्यात आले.
तेल्हा-यात पुन्हा प्रतिनियुक्त्या
तेल्हारा पंचायत समितीमध्ये १४ शिक्षकांना प्रतिनियुक्त्या देण्यात आल्या. त्या नियमबाह्य आहेत. सभापती, गटविकास अधिकाऱ्यांची मंजुरी नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्या परस्पर केल्या. त्यांच्यावर कारवाईची मागणी शोभा शेळके, दामोदर जगताप, लव्हाळे यांनी लावून धरली. त्यावर संबंधितांची खातेचौकशी करण्याचे सांगण्यात आले. सोबतच मोेफत पाठ्यपुस्तके वाटपातील शेकडो पुस्तके पंचायत समितीमध्ये पडून आहेत. त्याची चौकशी करून ती गरजूंना देण्याची मागणीही करण्यात आली.
जनसुविधा, तीर्थक्षेत्र निधी खर्चासाठी मुदतवाढीची मागणी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधेची कामे करणे, तीर्थक्षेत्राच्या विकासाचा निधी ३१ मार्च रोजी परत गेला आहे. त्याची मुदत संपल्याने तो खर्च करता येत नाही. त्यामुळे हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव पाठवावा, असे गोपाल कोल्हे यांनी सांगितले.
दानवेंच्या निषेधाचा ठराव
शेतक-यांच्या घामातूनच देश चालतो. त्या शेतकऱ्यांना अपशब्द बोलून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी अवमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्याचा ठराव सभेत गोपाल कोल्हे यांनी मांडला. तो मंजूर झाला.
सोनकुसरे यांचा प्रभार काढा
महिला व बालविकास अधिकारी एस.पी.सोनकुसरे कोणतेच काम करत नाहीत, तसेच सभेच्या दिवशी सुटीवर जातात. त्यामुळे टीएचआर पुरवठ्याची माहिती गेल्या सहा महिन्यांपासून दिली जात नाही. त्यांचा प्रभार काढून त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत सुटीवरच पाठवा, अशी मागणीही शेळके यांनी केली.