सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा सर्वाधिक वापर
By Admin | Updated: September 11, 2014 00:11 IST2014-09-11T00:11:35+5:302014-09-11T00:11:35+5:30
लोकमत सर्वेक्षण;तरूणाई ऑनलाईन, मोबाईलमुळे इंटरनेट अधीक सोयीचे.

सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा सर्वाधिक वापर
बुलडाणा : इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. स्मार्टफोनमुळे इंटरनेट सुविधा अधिक सोयीचे व स्वस्त झाली असल्याने सामान्याच्या आवाक्यात आली आहे. समाजात विशेषत: तरुण वर्गात वाढलेल्या इंटरनेट वापराबाबत लोकमतने आज सर्वेक्षण केले असता ७७ टक्के युवक सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा वापर करतात हे समोर आले आहे.
फेसबुक, व्हॉटसअप या दोन संपर्क संवादाच्या माध्यमांचा सर्वाधिक वापर होत असून या व्यतिरिक्त इतर कामांसाठी १५ टक्के युवक इंटरनेटचा वापर करतात मात्र फक्त ८ टक्के युवक इंटरनेटची मदत ही संदर्भ शोधण्यासाठी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
** इंटरनेटचा वापर कशावर करता ?
तब्बल ८८ टक्के युवकांनी मोबाईलवर हा पर्याय निवडला आहे. तर १२ टक्के युवक हे घर, महाविद्यालय किंवा सायबरकॅफेमध्ये संगणकावर इंटरनेटचा वापर करतात.
** ऑनलाईन राहण्यासाठी सोयीची वेळ कोणती?
२८ टक्के तरुण हे नेहमीच ऑनलाईन असतात तर २९ टक्के तरुण हे काम असेल तेव्हाच इंटरनेटशी कनेक्ट होतात. विशेष म्हणजे तब्बल ४३ टक्के युवक हे रात्री ऑनलाईन राहणे पसंत करतात.
** सोशल मिडियामुळे नियमित काम प्रभावित होतं का?
सोशल मिडियाच्या वापरामुळे कामावर परिणाम होतो. त्यामुळेच विविध कार्यालयात सोशल मिडियाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. यादृष्टीने तरुणांना विचारणा केली असता २२ टक्के तरुणांनी कामावर परिणाम होतो, अशी कबुली दिली. २९ टक्के लोकांना परिणाम होत नाहीत असे वाटते. तर ४९ टक्के तरुणांनी या संदर्भात निश्चित सांगता येणार नाही असे उत्तर नोंदवले आहे.