भाजपातील अंतर्गत कलह शिगेला

By Admin | Updated: May 19, 2015 01:20 IST2015-05-19T01:20:36+5:302015-05-19T01:20:36+5:30

आज नगरसेवकांची बैठक.

The internal conflict between the BJP and Shigela | भाजपातील अंतर्गत कलह शिगेला

भाजपातील अंतर्गत कलह शिगेला

अकोला : मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनासाठी जीआयएस प्रणाली लागू करणे, शहर बस सेवा सुरू करण्यासह सिमेंट काँक्रिटच्या सात रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या मुद्दय़ावरून भाजपमधील अंतर्गत कलह शिगेला पोहचले आहेत. महापौर उज्ज्वला देशमुख विश्‍वासात घेत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारीची पक्षाचे संघटनमंत्री रामदास आंबटकर यांनी गंभीर दखल घेतली असून, उद्या मंगळवारी तातडीने नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेत मर्जीतल्या कंत्राटदारांच्या थकीत देयकांची यादी तयार करणे, त्यावर बजेट मंजूर करवून घेणे अन् देयके काढण्यापूर्वीच दलालीचे पैसे हडप करण्याचे प्रकार सत्तापक्षाकडून सुरू आहेत. भाजपा-शिवसेनेच्या काळात प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराला आळा बसण्याच्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या असून, खुद्द सत्ताधार्‍यांमध्येच कमिशनखोरीवरून अंतर्गत कलह टोकाला गेल्याची परिस्थिती आहे. हीच पद्धत मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनासाठी लागू होणार्‍या जीआयएस प्रणालीची निविदा तसेच शहर बस सेवेच्या निविदेतही लागू करण्यात आली. दोन्ही एजन्सीच्या संचालकांना पदाधिकार्‍यांसह काही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मोठय़ा रकमेची मागणी करण्यात आल्याने इतर नगरसेवकांच्यादेखील सुप्त इच्छा जागृत झाल्या. पैसे मिळत असतील, तरच या विषयांना सभागृहात मंजुरी द्यायची,अन्यथा नाही,अशी भूमिका सर्वपक्षीय प्रामाणिक नगरसेवकांनी घेतल्याने महापौर उज्ज्वला देशमुख, आयुक्त सोमनाथ शेटे यांची कोंडी झाली आहे. या तीनही विषयांना मंजुरी देण्यासाठी महापौरांनी सर्वसाधारण सभेची तारीख निश्‍चित करण्यासाठी जीवाचा आटापीटा चालवला असला तरी त्यांच्या भूमिकेला पक्षातील नगरसेवकांचा प्रचंड विरोध आहे. या विरोधामुळे शहराचा विकास ठप्प पडल्याची जाणीव वरिष्ठ नेत्यांना होत असल्यामुळे की काय, संघटन मंत्री रामदास आंबटकर यांनी नगरसेवकांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी तातडीने नगरसेवकांच्या त्यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.

Web Title: The internal conflict between the BJP and Shigela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.