अकोला रेल्वेस्थानकावर लागणार 'इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:08 IST2019-01-09T13:08:11+5:302019-01-09T13:08:30+5:30
अकोला : विमानतळासारखी सुरक्षा देशातील रेल्वेस्थानकांना देण्यासाठी देशभरातील २०२ रेल्वेस्थानकांवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसएस) लावण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असून, या २०२ रेल्वेस्थानकांमध्ये अकोला रेल्वेस्थानकाचा समावेश आहे.

अकोला रेल्वेस्थानकावर लागणार 'इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम'
अकोला : विमानतळासारखी सुरक्षा देशातील रेल्वेस्थानकांना देण्यासाठी देशभरातील २०२ रेल्वेस्थानकांवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसएस) लावण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असून, या २०२ रेल्वेस्थानकांमध्ये अकोला रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. आयएसएस प्रकल्पात भुसावळ विभागातील मनमाड, नाशिक, भुसावळ, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. आयएसएस प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याने अनेक प्रवाशांचे याकडे लक्ष लागले आहे.
अलाहाबाद येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी विमानतळाच्या धर्तीवर रेल्वेस्थानकांनादेखील कडेकोट सुरक्षा देण्याचा प्रकल्प अस्तित्वात येत असल्याची घोषणा केली. देशातील मोठ्या जंक्शन रेल्वेस्थानकांवर ही सुरक्षा लावली जाणार असून, यासाठी २०२ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. २६/११ च्या घटनेनंतर घातपाताच्या घटनांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने ही सुरक्षा लावली जाणार आहे. ज्याप्रमाणे विमानतळावर दोन तास आधी पोहोचणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकांवर २० मिनिटे आधी पोहोचले बंधनकारक राहणार आहे. जे प्रवासी वेळेच्या आत पोहोचणार नाही, त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास नाकारला जाऊ शकतो. विशिष्ट चेकपोस्ट एन्ट्रीतूनच प्रत्येक प्रवाशांना जावे लागेल. त्यामुळे इतरांना या लाइनमधून येणे कठीण होणार आहे. या तपासणीसाठी वेळ जाणार असल्याने आता रेल्वेस्थानकावर वेळेवर गाडी पकडणे शक्य होणार नाही. तपासणीच्या ठिकाणी बॉम्ब डिसेक्शन आणि त्यास निष्क्रिय करणारे पथक, आरपीएफ जवान कार्यरत राहतील. व्यक्ती आणि सामानाची येथे कसून तपासणी केली जाणार आहे. संशय येताच गेटबंद करून संबंधित व्यक्तीला तातडीने ताब्यात घेण्यात येईल. सोबतच या तपासणीची सीसी कॅमेराद्वारे रेकॉर्डिंगही होणार आहे. हायटेक अद्ययावत यंत्रणेने होणाऱ्या या तपासणीच्या प्रकल्पासाठी ३८५.०६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मध्य रेल्वेच्या या स्थानकांवर राहील ‘आयएसएस’!
मध्य रेल्वेच्या उपरोक्त सहा स्थानकांसह नागपूर, पुणे, मिरज, सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनल, ठाणे आणि कल्याण या रेल्वेस्थानकांवरदेखील आयएसएसचा समावेश आहे. सर्वांत जास्त सुरक्षा भुसावळ डिव्हिजनमध्येच देण्यात येणार आहे.
भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकांची निवड आयएसएस प्रकल्पासाठी झाली आहे. सुरुवातीला मुंबई परिसरातील आणि महत्त्वाच्या स्थानकांवर ही सुरक्षा दिली जाईल. याबाबत अद्याप एवढेच निर्देश आलेले आहेत.
-जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ डीआरएम कार्यालय.