सरकारी विमा कंपनीला डावलून खासगी कंपनीला विमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:26+5:302021-02-05T06:15:26+5:30
गजानन वाघमारे बार्शिटाकळी: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून, दुधाळ जनावरे व शेळी गटांचा विमा काढताना सरकारी ...

सरकारी विमा कंपनीला डावलून खासगी कंपनीला विमा!
गजानन वाघमारे
बार्शिटाकळी: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून, दुधाळ जनावरे व शेळी गटांचा विमा काढताना सरकारी विमा कंपनीला डावलून खासगी कंपनीकडून विमा उतरविण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
भारत सरकारची विमा कंपनी दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी ४० हजार रुपये किमतीच्या म्हशीचा (दुधाळ जनावर) विमा ४ रुपये ८० पैसे प्रतिशेकडा म्हणजे १ हजार ९२० रुपये आकारला जातो. तोच विमा काढण्यासाठी खासगी विमा कंपनी ‘बजाज अलायन्स’ २ हजार ५३१ रुपये विमा रक्कम आकारत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लाभार्थींकडून प्रतिम्हैस ६११ रुपये जास्त वसूल केले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात जिल्हा परिषदने दोन वर्षांत २ हजार (दुधाळ जनावरे) वाटप केली असून, प्रतिम्हैस ६११ रुपये असे जवळपास १२ लाख रुपये खासगी विमा कंपनी ‘बजाज अलायन्स’ने जिल्हा परिषदेकडून अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाटले आहेत. १२ लाख रुपयांची वसुली न करता, उलट यंदा पुन्हा पातूर, अकोला, मूर्तिजापूर व अकोट तालुक्यात दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपावेळी विमा उतरविताना सरकारी विमा कंपनीला डावलुन पुन्हा खासगी कंपनीला प्राधान्य दिले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
-------------------------------------------------------------------------------
पालकमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली !
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपात भारत सरकार स्वाधीन असलेल्या कंपनीकडूनच विमा काढावा, असे पत्र पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २५ डिसेंबर २०२०ला दिले आहे. मात्र, जिल्हा पशुधन अधिकारी यांनी सदर पालकमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. सद्यस्थितीत अकोट, पातूर, अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात सर्रास दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपात खासगी ‘बजाज अलायन्स’ विमा कंपनीकडून विमा काढला जात असल्याचे चित्र आहे.
-----------------
पालकमंत्र्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. ज्या तालुक्यात बरेच दिवसांपासून जी कंपनी सेवा देत आहे, त्या कंपनीला प्राध्यान्य देऊन त्या तालुक्यात विमा काढला जात आहे. यापूर्वी बजाज अलायन्स विमा कंपनीकडे विमा काढताना जे जास्तीचे पैसे आकारले ते ऑडिटमध्ये निष्पन झाल्यावरच वसुलीची कारवाई करण्यात येईल.
- गजानन दळवी, जिल्हा पशुधन अधिकारी, जि. प., अकोला.