अमेरिकेकडे पायघड्या घालण्याऐवजी मंदिरातील सोने बाहेर काढा!
By Admin | Updated: November 13, 2014 01:10 IST2014-11-13T01:10:22+5:302014-11-13T01:10:22+5:30
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे परखड मत.
_ns.jpg)
अमेरिकेकडे पायघड्या घालण्याऐवजी मंदिरातील सोने बाहेर काढा!
विवेक चांदूरकर/ अकोला
अमेरिकेसह इतर देशांकडे पायघड्या घालण्याऐवजी, भीक मागण्याऐवजी, देशातील मंदिरांमध्ये असलेले सोने बाहेर काढा व त्याचा देशाला उपयोग होऊ द्या, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी ह्यलोकमतह्णशी बातचित करताना व्यक्त केले.
प्रश्न: केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार खासगीकरणावर भर देत आहे, रेल्वेच्याही खासगीकरणाचे सुतोवाच करण्यात आले आहे. याबाबत तुमचे मत काय?
उत्तर: सरकारने खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे, तसेच विदेशातील कंपन्यांना वारंवार निमंत्रण देण्यात येत आहे, कर्ज मागण्यात येत आहे. विदेशाकडे कर्ज मागण्याऐवजी, अमेरिकेपुढे पायघड्या घालण्याऐवजी, देशातील मंदिरांमध्ये जी किती तरी संपत्ती आहे, सोने आहे, ते बाहेर काढायला हवे व त्या संपत्तीतून देशाचा विकास करायला हवा. यामुळे देशावर कर्जही होणार नाही व विकासही होईल.
प्रश्न: पंधरा वर्षांनंतर राज्यातही सरकार बदलले आहे, नव्या केंद्र व राज्य सरकारकडून तुम्हाला अपेक्षा आहेत काय?
उत्तर: आमचा लढा अधिक तीव्र होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातआमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या कार्यकाळात मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही जोरदार लढा देऊ. आमच्या मागण्या मान्य होतील, अशी आम्हाला आशा आहे.
प्रश्न: चळवळीचे स्वरूप आगामी काळात कशा प्रकारचे राहील?
उत्तर: असंघटित क्षेत्रात काम करणार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतो. या क्षेत्रात केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक प्रश्नही महत्त्वाचे आहेत. हमाल, माथाडी हे सामाजिकदृष्ट्या शोषित आहेत. या क्षेत्रात स्त्री-पुरुष भेदही महत्त्वाचा आहे. स्त्रियांना पुरुषापेक्षा कमी मजुरी मिळते. त्यांनाही समान मजुरी मिळायला हवी. त्याही पुरुषांएवढेच काम करतात.
प्रश्न: तुमच्या मागण्या जुन्याच आहेत की नवीन? सरकारकडून काही नवे कायदे अपेक्षित आहेत?
उत्तर: हमाल, माथाडींच्या हक्काचे जे कायदे झालेले आहेत, त्यांची अंमलबजावणी होत नाही आहे, ती व्हायला हवी. सामाजिक सुरक्षा कायदा मान्य झाला आहे. दारिद्रय़ रेषेखालीलची अट ही शासनाच्या बाजूची आहे. त्यामुळे गरिबांवर अन्याय होत आहे.
प्रश्न: भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढून टाका, अशी तुमची मागणी आहे काय?
उत्तर: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, किंवा आरोप सिद्ध झाले आहेत, अशांना मंत्रिमंडळात घेऊ नका, अशी मागणी मी केली आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही त्यांचा मंत्रिमंडळात समोवश करण्यात आला आहे, अशा मंत्र्यांना काढून टाकायला हवे.
प्रश्न: आपण अंधश्रद्धा निर्मुलन समितीमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर आता चळवळीचे स्वरूप काय असेल?
उत्तर: दाभोलकर गेल्यानंतर चळवळ संपणार नाही, तर त्याच गतीने सुरू राहणार आहे. आता भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे हिंदुत्ववादी शक्ती डोके वर काढत आहे. त्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे.
प्रश्न: भाजपच्या कार्यकाळात पुरोगामी चळवळ कशी असेल?
उत्तर: भाजपची सत्ता हा पुरोगामी चळवळीसाठी संकटकाळ आहे. आम्ही उघड्या डोळ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यघटनेला धक्का लावू देणार नाही.