एकवीसऐवजी वीस एक बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:38 PM2019-06-21T12:38:11+5:302019-06-21T12:38:15+5:30

या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

Instead of twenty-one changes, students will be confused! | एकवीसऐवजी वीस एक बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार!

एकवीसऐवजी वीस एक बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार!

Next

अकोला: बालभारतीने इयत्ता दुसरीच्या गणित विषयात आणि संख्या वाचनाच्या केलेल्या बदलामुळे सोशल मीडियावर प्रचंड वादळ उठले आहे. या बदलाची शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बालभारतीने गणित विषयात केलेला बदल अनाकलनीय आहे. यापूर्वी एकवीस, बावीस, तेवीस शिकविले जायचे. पाढे म्हटले जायचे आहे. आता विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक असे शिकविले जाणार आहे. त्यातही मुलांना पाढे कसे शिकवायचे, असा प्रश्न पूर्व प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित करीत या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
गणिताच्या विषयामध्ये जोडाक्षरांचे उच्चारण करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते. म्हणून बालभारतीने इयत्ता दुसरीच्या गणित विषयात काही बदल केले आहेत. एकवीस नव्हे, तर आता वीस एक, बावीसऐवजी वीस दोन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. ७१ चा उच्चार सत्तर एक असा करावा लागणार आहे. त्र्याण्णवचा उच्चार करणे विद्यार्थ्यांना कठीण होतो म्हणून त्यामुळे नव्वद तीन असा उच्चार करावा लागेल. १ ते १00 या ठिकाणी जिथे जोडाक्षरे येतात. तिथे संख्या वाचनाची सूचना बालभारतीच्या अभ्यास मंडळाने केली आहे. या बदलाचा विद्यार्थी, शिक्षकांवर काय परिणाम होणार आहे, विद्यार्थी हा बदल स्वीकारतील का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात पूर्व प्राथमिक शिक्षकांनी विषयातील बदलाबद्दल नाराजी व्यक्त करीत, बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. सध्याची पिढी अत्यंत हुशार आहे. जुन्या गणित विषय, पाढ्यांचे उच्चारण कठीण असले तरी, त्यातून विद्यार्थ्यांची भाषाशुद्धी होते, अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी नोंदविल्या आहेत. (प्रतिनिधी)
जुना अभ्यासक्रम चांगला आहे. पाढ्यांचे उच्चारण कठीण असले तरी, या उच्चारणामुळे विद्यार्थ्यांची भाषाशुद्धी होते. बालभारतीने गणित विषयात केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. मराठीतील पाढे आयुष्यभर लक्षात राहतात. एकवीसऐवजी वीस एक असा बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे का?
-भारती कुळकर्णी, उपमुख्याध्यापिका,
बालशिवाजी प्राथमिक शाळा.

गणित विषयात बदल करण्याची काहीच गरज नव्हती. विद्यार्थ्यांना जुन्याच विषयाचे वळण लागले आहे. त्यांना नवीन बदलानुसार शिकविताना अडचणी जातील. विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांनी एकवीसही लिहिले आणि वीस एकही लिहिले तर दोन्ही उत्तरांना गुण मिळणार आहेत का, असतील तर हा बदल योग्य आहे.
-ओरा चक्रे, गणित शिक्षक .


अत्यंत चुकीचा निर्णय आहे. बालभारतीला गणित विषयात बदल करून काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. जोडाक्षरे उच्चारणामुळे विद्यार्थ्यांना काही परिणाम होत नाही. संख्या वाचनामुळे विद्यार्थ्यांना गणित सोपे जाईल, हा समज चुकीचा आहे.
-मनीष गावंडे, राज्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक संघटना.

शहरी व ग्रामीण भागातील मुलांना १00 पर्यंत पाढे येतात. त्यामुळे गणित विषयाची केलेली तोडफोड चुकीची आहे. एकवीसऐवजी वीस एक शिकविणे हास्यास्पद आहे. व्यवहारातही हेच सूत्र वापरणार आहोत का, आताची मुले हुशार आहेत. कठिणातले कठीणसुद्धा मुले सहज शिकतात. त्यामुळे बदल करण्याची गरज नव्हती.
-मंगला पोहरे, शिक्षिका, फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा.

गणित विषयामध्ये केलेल्या बदलाचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर परिणाम होणार आहे. जोडाक्षरे मुले लहानपणापासून शिकतात. उलट हे विद्यार्थ्यांना समजणार नाही. सध्याची मुले स्मार्ट अहेत. त्यांचे आकलन लक्षात घेऊन बदल करणे अपेक्षित होते.
-आशू आल्हाद भावसार, पालक.

 

Web Title: Instead of twenty-one changes, students will be confused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.