विना राॅयल्टी टिप्पर सोडल्याची चौकशी सुरू; जिल्हा खनिकर्म अधिकारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:15+5:302021-09-24T04:23:15+5:30
अकोट : गौणखनिज तपासणी नाक्यावरून विना रॉयल्टी गौणखनिज भरलेले दोन टिप्पर कारवाई न करताच सोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार बुधवारी ...

विना राॅयल्टी टिप्पर सोडल्याची चौकशी सुरू; जिल्हा खनिकर्म अधिकारी दाखल
अकोट : गौणखनिज तपासणी नाक्यावरून विना रॉयल्टी गौणखनिज भरलेले दोन टिप्पर कारवाई न करताच सोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार बुधवारी घडला. त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून, त्या अकोटात दाखल झाल्या. त्यांनी तालुक्यातील गौणखनिज खदान, क्रशर व तपासणी नाक्यावरील रेकॉर्डची तपासणी सुरू केली.
गौणखनिजची चोरी व अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गौणखनिज तपासणी नाका सुरू करण्यात आला. या तपासणी नाक्यावरून २२ सप्टेंबरला विना राॅयल्टी असलेले १२ ब्रास गौणखनिज भरलेले दोन टिप्पर कारवाई न करताच सोडण्यात आले. वाहन क्रमाकांचा संभ्रम, फिनिशिंग मटेरियल असल्याचा बनाव करीत कारवाई टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार घडले. विशेष म्हणजे गाजीपूर तपासणी नाक्यावर २२ सप्टेंबरला सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या राॅयल्टी नसलेले वाहन सोडण्यात आले. या प्रकाराबाबत कंत्राटदाराचे नाव व वाहन क्रमांकाचा संभ्रम निर्माण करण्यात आला. परंतु, वाहन चालकाजवळ राॅयल्टी नसतानाही दोन्ही टिप्पर तपासणी नाक्यावरील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून सोडल्याची कबुली दिली आहे. अवैध गौणखनिज वाहतूक करणारे दोषींना खुद्द शासकीय अधिकारी-कर्मचारी पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले अकोटमध्ये दाखल झाल्या. तहसीलदार नीलेश मडके, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह त्यांनी तालुक्यातील गौणखनिज खदानी व क्रशरवर जाऊन पाहणी केली. रेकॉर्ड तपासणी हाती घेतली.
फोटो:
कारवाई होणार का?
विना राॅयल्टी सोडलेल्या वाहनाच्या चौकशीचा विषय ऐरणीवर आला आहे. त्या वाहन क्रमांकाची नोंद तपासणी रजिस्टरमध्ये घेतली जाते किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करीत या वाहनाचा शोध घेत संबंधितावर कारवाई करीत गौणखनिजची चोरी व अवैध वाहतुकीला आळा घालण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.