नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांंची चौकशी
By Admin | Updated: April 7, 2015 02:00 IST2015-04-07T02:00:13+5:302015-04-07T02:00:13+5:30
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पाटील यांची माहिती.

नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांंची चौकशी
अकोला : नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींच्या तक्रारीवर टाळाटाळ केल्यासंदर्भात प्राचार्य आर.टी. सिंह यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. नवोदय विद्यालयातील शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके यांच्याकडून होत असलेल्या छळाची पहिली तक्रार एका विद्यार्थिनीने २१ मार्च रोजी प्राचार्य सिंह यांच्याकडे केली होती. या तक्रारीची प्राधान्याने चौकशी करून त्यानुसार कारवाई करणे क्रमप्राप्त होते; प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यानंतरच २३ मार्च रोजी आणखी एका विद्यार्थिनीने या प्रकरणी तक्रार केली. त्यानुसार प्राचार्यांंनी अहवाल तयार करून पुणे येथे उपायुक्त कार्यालयाकडे पाठविला; मात्र मुलींचा छळ सुरू असतानाही ठोस भूमिका घेतली नाही. १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी निर्देश दिल्यानंतर प्राचार्यांंनी पोलिसांत तक्रार दिली. गंभीर तक्रारीवर कारवाई करण्यास उशीर का झाला, याचा शोध घेण्यासाठी प्राचार्यांंची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. दोषी आढळल्यास प्राचार्यांंविरुद्धही कारवाई केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.