विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघ विजेता
By Admin | Updated: September 20, 2014 00:43 IST2014-09-20T00:43:14+5:302014-09-20T00:43:27+5:30
मालदिव येथे संपन्न झालेल्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघाचे विजेतेपद कायम.

विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघ विजेता
अकोला: मालदिव येथील सन आयलॅण्ड रिसॉर्टमध्ये १७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून विजेतेपद कायम राखले. स्पर्धेत १७ देश सहभागी झाले होते. कॅरम असोसिएशन ऑफ मालदिवचे अध्यक्ष अहमद मुबीन यांच्या देखरेखीखाली स्पर्धा यशस्वी झाली. मालदिवमधील भारतीय दूतावासचे उच्चायुक्त राजीव शहारे यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक प्रभजितसिंह बछेर (अकोला-विदर्भ) यांच्यामार्फत भारतीय संघाच्या विजयी कामगिरीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
भारताने पुरुष गटात प्रथम तर श्रीलंका व बांगला देशाने द्वितीय व तृतीयस्थान पटकाविले. महिला विभागात भारत प्रथम, श्रीलंका द्वितीय व मालदीव तृतीय स्थानावर राहिला.
पुरुष एकेरीत भारताच्या के. श्रीनिवास याने देशाच्या मो. गुफरान याचा १३-२५, २५-१८, २५-१८ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताच्या व्ही.आकाश याने भारताच्याच रियाज अकबर अली याचा २५-११, २५-१२ असा पराभव केला. माजी विश्वकप विजेती दोन वेळा विश्वविजेत राहिलेल्या भारताच्या रश्मीकुमारी हिने कविता सोमांची हिचा २५-१७, २५-२२ असा पराभव करून विश्वविजेतेपद यावेळीही जिंकले. भारताच्याच काजलकुमारी व पी. जयश्री यांनी तिसरे व चौथेस्थान प्राप्त केले. पुरुष व महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण व रौप्यपदक जिंकली. स्विस लीग एकेरीत रौप्य व कांस्य पदक पटकाविले. प्रशिक्षक डॉ. नीरज संपथी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेल्या भारतीय कॅरम संघाची भविष्यातही चांगली कामगिरी होण्यासाठी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन प्रयत्नशील राहणार असल्याचे ऑल इंडिया कॅरम फेडरेशन महासचिव प्रभजितसिंह बछेर यांनी दुरध्वनीवरून कळविले.