अकोला : दिनांक १ एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू झाले. साधारण प्रत्येक ठिकाणी हे दर दहा रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षभरात २२५ रुपयांनी महाग झालेला सिलिंडर केवळ दहा रुपयांनी स्वस्त झाला आहे. या चलाखीत सिलिंडरची स्वस्ताई नावालाच असल्याचे दिसून येते.
नागरिकांना कोरोनासोबत महागाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या इंधन तेल, खाद्यतेलांसोबत डाळींचे भाव वाढले आहेत. मागील दहा महिन्यांपासून सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने महागाई आणखी भडकत आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरवरील किमतीत केवळ १० रुपयांची कपात केली आहे. नवीन दर १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. एलपीजी कपात करण्याचा फायदा ग्राहकांना मिळेल; मात्र हा दिलासा फार काही समाधानकारक नाही. मागील चार महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल २२५ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे महागाईला सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्यांसाठी १० रुपयांची ही कपात अतिशय कमी आहे. या कपातीनंतर विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ८२९ रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत ८३९ रुपये होती. मे २०२०नंतर एलपीजीच्या किमती कमी केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
--कोट--
गॅस सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे. सिलिंडरचा दर ८०० रुपयांच्यावर गेल्यानंतर केवळ १० रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे हा दिलासा म्हणता येणार नाही.
भाग्यश्री देशमुख, गृहिणी
--कोट--
सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे स्वयंपाक महागला आहे. त्यात इतरही वस्तूंच्या किमती वाढत आहेत. सिलिंडरवरील १० रुपये दिलासा म्हणजे स्वस्ताई नावालाच असल्याचे दिसून येते.
रोशनी वाहुरवाघ, गृहिणी
--कोट--
स्वयंपाकातील सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशात सिलिंडरची किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे. केवळ १० रुपये कमी झाल्याने मासिक बजेटमध्ये काही फरक पडणार नाही.
मनीषा पाटील, गृहिणी
--बॉक्स--
असे वाढले दर
नोव्हेंबर २०२० - ६१४.५०
डिसेंबर २०२० - ६६४.५०
जानेवारी २०२१ - ७१४.५०
फेब्रुवारी २०२१ - ७३९.५०
मार्च २०२१ - ८३९.५०
एप्रिल २०२१ - ८२९.५०