अकोलेकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; मनपा क्षेत्रात डेंग्यूच्या एका रुग्णाची नोंद
By प्रवीण खेते | Updated: September 14, 2022 17:25 IST2022-09-14T17:23:50+5:302022-09-14T17:25:51+5:30
कोविडची स्थिती नियंत्रणात असली, तरी किटक जन्य आजारांनी डोके वर काढले आहे

अकोलेकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; मनपा क्षेत्रात डेंग्यूच्या एका रुग्णाची नोंद
जिल्ह्यात सद्यस्थितीत व्हायरल तापीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्येमलेरिया, डेंग्यू सदृश्य तापीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मागील पंधरा दिवसांत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचा एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. मंगळवारी अकोट शहरात डेंग्यूच्या एका संदिग्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.
कोविडची स्थिती नियंत्रणात असली, तरी किटक जन्य आजारांनी डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश रुग्णांमध्ये मलेरिया, डेंग्यूचे लक्षणे आढळून येत आहेत. महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयातील संदिग्ध रुग्णांची नोंद केली जात आहे. त्यामुळे त्यांची एलआयझा चाचणी करणे शक्य होत आहे. मनपा आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे डेंग्यूच्या एका पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद करणे शक्य झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात तसे होताना दिसून येत नाही. परिणामी डेंग्यूचा रुग्ण असला, तरी त्याची संदिग्ध रुग्ण म्हणूनच नोंद केली जात आहे. मंगळवार १३ सप्टेंबर रोजी अकोट शहरातील अशाच एका डेंग्यूच्या संदिग्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
अशी आहे रुग्णांची स्थिती (२२ जानेवारी ते १३ सप्टेंबर २०२२)
मलेरिया - ३४
डेंग्यू - १५
चिकुनगुनिया - १८
मनपा भागात डेंग्यूचे सर्वेक्षण
महापालिका क्षेत्रात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील हायरिस्क भागात डेंग्यूचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रमामुख्याने अकोट फैल परिसरातील रविनगर, संताजीनगर भागाचा समावेश आहे. सर्वेक्षणादरम्यान या भागातील घरांमध्ये साठवलेल्या पाण्यात, कुलरच्या टपात, तसेच खुल्या भांड्यात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागामार्फत परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.