माळेगाव बाजार परिसरात अवैध दारु विक्रीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 19:31 IST2017-04-26T19:31:36+5:302017-04-26T19:31:36+5:30
माळेगाव बाजार- दारुड्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी गावात शासकीय नियम धाब्यावर बसवून सकाळी ५ वाजेपासून दारू विक्री सुरू होत असल्याचे निदर्शनास आले.

माळेगाव बाजार परिसरात अवैध दारु विक्रीत वाढ
ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव घ्यावा
माळेगाव बाजार : सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहाचा घोट घेतल्याशिवाय दिवसाला प्रारंभ होत नाही. परंतु दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्यांना सकाळीच दारूचा पहिला घोट घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटत नाही. अशाच दारुड्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी गावात शासकीय नियम धाब्यावर बसवून सकाळी ५ वाजेपासून दारू विक्री सुरू होत असल्याचे निदर्शनास आले.
तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या माळेगाव बाजार येथे खुलेआम दारूची विक्री सुरू आहे. यामुळे येथील महिलांमध्ये दारू विक्रेत्यांविषयी कमालीचा रोष व्यक्त होत आहे. दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधिन झाला तर अनेकांना कमी वयात मृत्यू आला. दारूच्यापायी अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यापूर्वी ८ मार्च माहिला दिनी येथील परवाना असलेल्या देशी दारूचे दुकान उध्वस्त करण्यात आले होते. त्या घटनेला बरीच वर्ष उलटले आहे. त्या आंदोलनात स्थानिक महिलांचा मोठा सहभाग होता. तेव्हापासून येथील दारू विक्री काही वर्ष बंद होती. मात्र, आता आणखी दारू विक्रीस ऊत आला आहे.
गरिबांच्या संसारावर डल्ला मारणारे दारू विक्रेते ‘गब्बर’ झाले तर पिणाऱ्यांची वाट लागली. हल्ली बिअर बार बंद असल्यामुळे माळेगाव बाजार गावात नजीकच्या बुलडाणा व कुऱ्हा येथून चोरी-चुपके दारू येत आहे. दारू पिण्याकरिता तेल्हारा शहरातून काही मंडळी माळेगावात येत असल्याचे कळते. विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या लहानमोठ्या जवळपास ७ लोकांकडे दारू विक्री सुरू आहे. याच दारू विक्रेत्यांकडे सकाळी ५ वाजतापासून दारू पिणाऱ्यांची वर्दळ असते. आजुबाजूच्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याला भांडणतंट्यामुळे काही लोक विरोध करीत नाहीत.
दिवसभर दारू घेणाऱ्यांना सकाळी ५ वाजता (उतारा) चहाचा घोट घेण्यापूर्वीच दारूचा घोट पाहिजे. हा प्रकार येथे पहावयास मिळतो.
सध्या तेल्हारा शहरातील सर्वच देशी, विदेशी दारू दुकाने बंद असून जवळच्या माळेगाव बाजारसारख्या मोठमोठ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. अवैध दारू विक्री संदर्भात असलेल्या नियमावलीकडे दारुबंदी उत्पादन शुल्क विभागानेही अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे.